ठाणे -ठाणे गुन्हे शाखेने एका नायजेरियनला अटक करून त्याच्याकडील 274 ग्राम कोकेन जप्त ( Thane Crime Branch Seized Drags ) केले आहे. त्यासोबत 6 मोबाईल फोन एक कार असा 1 कोटी 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.
१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी -
ठाण्याच्या कासारवडवली परिसरात कोकेन आणि एमडीची विक्री करण्यासाठी एक आरोपी येणार असल्याची विश्वसनीय माहिती गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला मिळाली. पोलीस पथकाने घोडबंदर रोडवरील द बाईक सुरज प्लाझा हॉटेलसमोर आनंदनगर नाका येथे सापळा रचुन एका नायजेरियन आरोपीला १ कोटी १२ लाख रुपयांच्या कोकेन-एमडी 6 मोबाईल फोनसह अटक केली. त्याच्याविरोधात कासार वडवली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयाने १ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
१ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त -
अटक आरोपी डिक्सन चिडीबेरे इझे (३०) रा. ओमसाई एस.आर.ए. संस्था संघर्षनगर, चांदीवली, मुंबई-७२ हा अमली पदार्थ कोकेन-२७४ ग्राम आणि ६० ग्राम एमडी पावडर घेऊन कासारवडवली आनंदनगर परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडके याना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने घोडबंदर रोडवरील द बाईक सुरज प्लाझा हॉटेलसमोर आनंदनगर नाका येथे सापळा रचून संशयास्पद आरोपीला जेरबंद केले. अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडून २७४ ग्रॉम कोकेन आणि ६० ग्रॉम एमडी असा एकूण १ कोटी १२ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ आढळले. पोलीस पथकाने त्याला अमली पदार्थासह अटक केली. पोलिसांनी आरोपी इझे ज्या गाडीतून आला ती हुंदाई आय-२०, ६ मोबाईल, एक इलेक्ट्रॉनिक काटा हस्तगत केला. पोलीस पथकाने अमली पदार्थ आणि साहित्यासह १ कोटी १७ लाख ३८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.