ठाणे -आपल्या मित्रानेच खिशातून ४०० रुपयांची रक्कम काढल्याचा राग मनात धरून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपी अन्सार अब्दुल खान(३४) याला हत्येप्रकरणी दोषी ठरवीत ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदरची घटना नवीमुंबईच्या तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुलाखाली तीन वर्षांपूर्वी घडली होती.
डोक्यात दगड मारून हत्या
मृत शफिक रफिक शेख आणि अन्सार अब्दुल खान हे दोघे मित्र आहेत. तर मृत हा तुर्भे पुलाखाली राहण्यास होता. शफिक याने १२ जुलै २०१८ रोजी अन्सार याच्या खिशातून ४०० रुपये काढले. याची माहिती अन्सार याला मिळताच त्याने दुसऱ्या दिवशी झोपेत असलेल्या शफिकच्या डोक्यात मोठा दगड मारून हत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शफिक हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी अन्सार अब्दुल खान याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान १४ जुलै रोजी उपचाहरदरम्यान शफीत याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्याचे परिवर्तन करीत हत्येचा गुन्हा दाखल केला.