ठाणे - मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात दिनांक 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्शवभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
9 जून ते 12 जून 2021 या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे, सखल भागात पाणी साचणे, दरड कोसळणे आदी घटना घडू शकतात. याबाबत करावयाच्या उपाययोजनाचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज सर्व सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली.
हेही वाचा-पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट राजकीय तडजोडीसाठी का?, उदयनराजेंचा सवाल
आयुक्तांनी हे दिले निर्देश-
शहरात ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी भेट देवून आवश्यक ती कार्यवाही करणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी सबमर्शीबल पंप बसविणे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथे बोटींची व्यवस्था करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळात प्रभाग समितीस्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही महापालिका आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.