ठाणे - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था खूपच बिकट आहे. शिवाय जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतही काँग्रेसची फारशी ताकद नाही. विशेष म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेत काँग्रेस एक घटक पक्ष म्हणून सामील आहे. मात्र राज्यात सत्ता असतानाही राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरलेल्या ठाणे जिल्ह्यात काँग्रेस व्हेंटिलेंटरवर असूनही आगामी महापालिका निवडणुकित 'एकला चलो रे'चा नारा दिला. मात्र काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षासह स्थानिक नेत्यांनी दिलेल्या 'एकला चलो'च्या घोषणाच्या फुग्यातून हवा काढली असून यापुढे सर्वच निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्षासोबत लढविल्या जातील, असे बुलढाण्यात जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये स्थानिक स्वराज निवडणुका लढविणाऱ्यावरून एकमत झाल्याचे दिसून येत नाही.
काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती झाली आहे. आक्रमक नेतृत्व अशी नानांची ओळख आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वामुळे तरी जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळणार का? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. मुंबई लगत असलेला ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. जिल्ह्यात एकूण सहा महापालिका आणि दोन नगरपालिका आहेत. यातील बहुतांशी महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात आहे. काँग्रेस प्रदेश पातळीवरील नेतृत्वाने ठाणे जिल्ह्याकडे कधीही लक्ष दिले नाही. त्यातही काँग्रेसने कल्याणचे संजय दत्त आणि मीरा भाईंदरचे मुझफ्फर हुसेन यांना विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व दिले. मात्र जिल्ह्यात काँग्रेस वाढविण्यास त्यांच नेतृत्व सक्षम ठरलेले नाही.
राजकीय घडामोडींना वेग ..
जिल्ह्यातील महापालिका व नगरपालिकेत काँग्रेस नगरसेवकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा आलेख घसरल्याचे आकडेवारीवरून दिसून येतो. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला सक्षम नेतृत्वाची उणीव नेहमीच भासली आहे. मात्र त्याकडे वरिष्ठांकडून नेहमीच कानाडोळा केल्याने जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली, अंबरनाथ आणि कुळगाव–बदलापूर या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील नव्या समीकरणाचा परिणाम या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील काँग्रेसला फुटीचे ग्रहण ..