ठाणे - कोविड सेंटरमधून कामावरून काढलेल्या नर्ससाठी आंदोलन करत असताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे महानगरपालिकेच्या समोर अचानक पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली. त्यानंतरही आंदोलन सुरू असताना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले.
अचानक झालेल्या या दोन्ही पोलिसांच्या कृतीमुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मात्र, त्यांना शांततेचे आवाहन केल्यावर हा विषय निवळला.
ठाणे पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये अविनाश जाधव यांच्यावर ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्यांना तडीपारीची नोटीस देण्यात येत असल्याचे लिहिण्यात आले आहे. आतापर्यंत आंदोलन आणि त्याबाबतीच्या अनेक डझन केसेस अविनाश जाधव यांच्यावर आहेत. या आंदोलनामुळे आता त्यांना ठाणे पोलिसांनी अचानक नोटीस बजावली आहे.