महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून महिला सरपंचासह पतीवर तलवारीने जीवघेणा हल्ला

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीचा राग मनात ठेवून महिला सरपंचासह पतीवर तलवारीने जीवघेणा हल्ला झाला. ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील वडपा स्मशानभूमी परिसरात मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.

By

Published : Apr 6, 2021, 9:33 PM IST

Updated : Apr 6, 2021, 10:02 PM IST

ठाणे -जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीचा राग मनात ठेवून महिला सरपंचासह पतीवर तलवारीने जीवघेणा हल्ला झाला. ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील वडपा स्मशानभूमी परिसरात मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या भ्याड हल्ल्यात सरपंच महिला किरकोळ जखमी झाली असली तरी पती गंभीर जखमी झाला आहे. या दोघांवरही शहरातील अल राजी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नियोजन करून रचला हल्ल्याचा डाव-


भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली खांडपे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच निलम महेश पाटील या आपले पती महेश सखाराम पाटील यांच्यासोबत आज सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास कामानिमित्त त्यांच्या चारचाकी कारने ठाणे येथे जात होत्या. गावच्या रस्त्याचे काम सुरु असल्याने महेश पाटील यांनी आपली गाडी वडपा गोदामातील पर्यायी रस्त्यावरून टाकली असता या रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमी जवळ त्यांच्या पाळतीवर असलेल्या तीन कार मधील इसमांनी त्यांची गाडी अडवून गाडीवर हल्ला केला. सरपंचांच्या गाडीच्या काचा फोडून महिला सरपंच निलम पाटील यांना गाडीतून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सरपंचाचे पती महेश पाटील यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी महेश पाटील यांच्यावर तलवार व इतर हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्यात महेश पाटील व त्यांच्या पत्नी देखील गंभीर जखमी झाले असून या दोघांवरही चावींद्रा रोडवरील अल राजी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हल्लेखोरांवर गुन्हा दाखल पोलीस तपास सुरु -

हा हल्ला ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली खांडपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व त्यांच्या साथीदारांनी केला असल्याची प्रतिक्रिया जखमी महिला सरपंच निलम पाटील यांनी दिली असून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अजित पाटील, नितेश पाटील , उमेश पाटील , शशी पाटील (सर्व रा . खांडपे) व त्यांच्या इतर ३ ते ४ साथीदारांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस उप निरीक्षक वैभव देशपांडे करीत आहेत

हेही वाचा-आम्ही फक्त दोन दिवसांच्या टाळेबंदीला सहमती दर्शवली होती - फडणवीस

Last Updated : Apr 6, 2021, 10:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details