नवी मुंबई : माझी 5 वर्षाची मुलगी मी शिवसेनेला दत्तक देते. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) कुटुंबप्रमुख तसेच सर्व शिवसैनिक तिचा मामा म्हणून सांभाळ करतील असे भावनिक वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. त्या नवी मुंबई वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात महाप्रबोधन ( Mahaprabodhana in the theater ) यात्रेनिमित्त भाषण करत असताना बोलत होत्या. गेल्या एक दोन दिवसांपासून आपण रहात असलेल्या सोसायटीमध्ये पोलीस येत आहेत. इतकेच नाही तर ते माझ्या सुरक्षिततेची चौकशी करत आहेत. मी त्यांना याबाबत विचारले असता माझ्या जीवाला धोका असल्याचे इनपूट मिळाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली असल्याचे अंधारेंनी म्हटले आहे. आम्ही डू ऑर डाय च्या भूमिकेत आहोत. त्यामुळे मला टार्गेट केले जात आहे. विरोधकांकडून मला धमकावण्याचा, मी महिला असल्यामुळे कमरेखाली वार करण्याचा प्रयत्न देखील होण्याची शक्यता अंधारेंनी व्यक्त केली आहे. भारतीय संवैधानिक चौकट मोडण्याचा डाव भाजप करत असून महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून आपण केवळ याबाबत लोकांचे प्रबोधन करत असल्याचे अंधारे म्हणाल्या.
यात चिथावणीखोर काय आहे ? माझ्या माणसांना कायद्याची भाषा कळत नाही. मी ती सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे यात चिथावणीखोर काय आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्राचे प्रश्न तसेच राहिले. तुम्ही सरकारमध्ये बसलाय ते उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी बसलाय की महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी असा सवाल अंधारे यांनी शिंदे सरकारला केला. माझ्या पक्षप्रमुखाला जो त्रास देईल त्याचा फक्त हिशोबच नाही तर, चक्रवाढ व्याजासह हिशोब घेतला जाईल अशी तंबी देखील अंधारे यांनी शिंदेंना दिली. भाजपाला देशातील सगळे विरोधी पक्ष संपवायचे आहेत, असे जर झाले तर देशात लोकशाही संपून हुकूमशाही येईल अशी भीती अंधारे यांनी यावेळी जाहिरपणे व्यक्त केली.