ठाणे - निर्माल्य पुर्नप्रक्रीया प्रकल्पातून शहरातील निर्माल्याची विल्हेवाट लावणाऱ्या, हरित कचऱ्यापासून इंधन तयार करणाऱ्या समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्यावतीने प्लास्टिकपासून इंधन निर्मिती प्रकल्पाला ठाण्यात सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून दिवसाला १०० किलो प्लास्टिकपासून जळावू इंधन तयार केले जाणार आहे. हे इंधन बॉयलर्ससाठी वापरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १ किलो प्लास्टिकमधून ६०० मिली इंधन तयार होणार आहे. हे इंधन एकत्रित करून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे शहरातील पॅकेजिंगसाठी वापरले जाणाऱ्या प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पध्दतीने पुर्नवापर होणार आहे.
ठाण्यात प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्पाला सुरुवात - ठाणे प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्प बातमी
ठाण्यात प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती करणारा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला १०० किलो प्लास्टिकपासून जळावू इंधन तयार केले जाणार आहे.

समर्थ भारत व्यासपीठ संस्थेकडून कोपरी येथील महापालिकेच्या जागेमध्ये ‘प्रकल्प पुर्नवापर ’ सुरू आहे. या माध्यमातून कचरा वेचक महिला, समर्थ व्यासपीठाचे कार्यकर्ते आणि शहरातील १० शाळांमधील विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक संकलीत केले जाते. शहरातील ३०० गृहनिर्माण सोसायट्यांमधील ८ हजार कुटुंबांकडूनही प्लास्टिक संकलीत केले जाते. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू होता. संकलीत झालेले प्लास्टिक पुर्नवापरासाठी मालेगाव, वसई किंवा पुण्यात पाठवले जात होते. मात्र, प्लास्टिक बंदीमुळे बाहेर पाठवण्याइतके प्लास्टिक संकलित होत नसल्यामुळे शहरातच पर्यावरणपुरक पध्दतीने प्लास्टिक विघटनाचा प्रकल्प उभारण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यातूनच समर्थ भारत व्यासपीठ कडून प्रयत्न सुरू झाले. सीएसआर फंडातून मिळालेल्या मशिन्सच्या सहाय्याने हा प्रकल्प चालवला जाणार आहे. ५ जुनला ही यंत्रणा शहरामध्ये दाखल करून आयुक्त संजीव जयस्वाल आणि मुंबई आयुक्तांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. तांत्रिक तपासण्या पुर्ण झाल्यानंतर १५ ऑगस्टपासून हा प्रकल्प इंधन निर्मितीच्या कार्यामध्ये सक्रीय झाला आहे.
हा उपक्रम छोटा मॉडेल उपक्रम असून याची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून दिवसाला ५० ते १०० किलो प्लास्टिक विघटीत करून एक किलो प्लास्टिकमधून ६०० मिली इंधन तयार केले जाते. कंपन्यांच्या बॉयलर्समध्ये त्याचा वापर केला जाणार आहे. या इंधनापासून प्रदुषके निर्माण होत नसल्याने त्याचा विपरीत परिणामही मानवी आरोग्यावर होत नाही. यापासून गॅसची निर्मितीही करता येऊ शकते. या प्रकल्पाच्या जोरावर एका स्वयंपाकघरात लागते इतके गॅसचे इंधनही इथे निर्माण होऊ शकते. हे इंधन एकत्र करून त्याची विक्री केली जाणार असल्याचे समर्थ भारत व्यासपीठाकडून सांगण्यात आले. ठाण्यातील दहा शाळांधील विद्यार्थी घरामधील प्लास्टिक एकत्र करून या संस्थेकडे सुपूर्त करणार आहे. त्यांच्याकडून प्लास्टिक संकलित करून ते या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. याशिवाय अशा प्रकारचे प्रकल्प अधिक संख्येने वाढवण्याची गरज असून एक मॉडेल प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पहाता येईल. अशी माहिती व्यासपीठाचे भटू सावंत यांनी दिली.