ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कल्याण पश्चिमच्या लाल चौकी परिसरात असलेल्या आर्ट गॅलरी येथे कोविड रुग्णालय सुरू केले आहे. या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका कोरोना बाधित महिलेवरच वॉर्डबॉयने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कोविड सेंटरमधील महिला रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून विकृत वॉर्डबॉयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीकांत मोहिते असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी वार्डबॉयचे नाव आहे.
धक्कादायक : कोविड रुग्णालयात कोरोना बाधित महिलेशी अश्लील चाळे, वार्डबॉयवर गुन्हा दाखल पीडित महिला नुकतीच बाळंत -
महापालिकेच्या लाल चौकी परिसरात असलेल्या गॅलरीतील कोविड रुग्णालयात नुकतीच बाळंतपण झालेल्या महिलेला रवीवार उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रवीवारी सायंकाळच्या सुमारास या कोविड सेंटरमधील विकृत श्रीकांत याने पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरून गेलेल्या या महिलेने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत एक तक्रार दिली त्यावरून बाजारपेठ पोलिसांनी विकृत वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले.
विकृत महिलांच्या विभागात गेलाच कसा? -
हा विकृत वॉर्डबॉय महिलांच्या विभागात गेलाच कसा? सुरक्षा यंत्रणा कुठे होती? हा सुरक्षा यंत्रणेचा निष्काळजीपणा नाही का? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित झाले असून कोविड सेंटर मधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर संबंधित दोषीवर कारवाई केली जाईल. अशी प्रतिक्रिया कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील यांनी दिली आहे.