ठाणे- एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर असेलला सद्गुरू हॉटेल आणि बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये असलेल्या या बारवर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. समीर वानखेडे यांना नवी मुंबईतील सद्गुरू हॉटेल व बारचा 27 ऑक्टोंबर 1997 ला परवाना दिला, तेव्हा वानखेडे यांचे वय 18 वर्षा पेक्षा कमी होते. त्यामुळे या बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. हा परवाना रद्द करण्यासाठी दारूबंदी कलम 54 लागू करण्यात आले आहे.
नवाब मलिकांनी केले होते आरोप -
समीर वानखेडे यांच्या मालकीचा सद्गगुरु बार आणि रेस्टॉरंट हा बार नवी मुंबईमधील वाशी येथील पाम बीच रोड लगत आहे. हा परिसर नवी मुंबईतील अंत्यत महागडा परिसर आहे. समीर वानखेडेचे वडील राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करत असताना फर्जीवाडा करुन एक लायसन्स समीर दाऊद उर्फ ज्ञानदेव वानखेडे याच्या नावावर सन १९९७- ९८ मध्ये घेतले. हे परमिट सन १९९७ पासून समीर वानखेडे याच्या नावावर नुतनीकरण होत राहिले आहे. ते आता २०२२ पर्यंत ३ लाख १७ हजार ६५० रुपये भरून करण्यात आलेले आहे. समीर वानखेडे याचे वय त्यावेळी १७ वर्षे १० महिने १९ दिवस होते. तरीही त्याच्या वडिलाने लायसन्स मिळवले. मुळात १८ वर्षाखालील कुणालाही लायसन्स दिले जात नाही, असे असताना ९७ पासून आजपर्यंत सद्गुरु रेस्टॉरंट आणि बार हा व्यवसाय सुरू आहे. २०१७ मध्ये समीर दाऊद वानखेडे याने आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यात त्याने याचा उल्लेख करताना त्याची १९९५ मध्ये एक कोटी रुपये किंमत दाखवली आहे. शिवाय वडील आणि आई यांची नावेही आहेत. आईकडून संपत्ती मिळाली आणि वर्षाला २ लाख रुपये भाडे मिळते असे नमूद केले आहे. २०२० मध्येही तीच किंमत आणि तितकेच भाडे मिळत असल्याचे नमूद केले आहे, हाच फर्जीवाडा आहे असा आरोप नवाब मलिकांनी केला होता.
परवाना समीर वानखेडे यांच्या नावावरच -
समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेमध्ये (IRS) रुजू झाल्यापासून बारचा परवाना त्यांच्या नावे असल्याचे वानखेडे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. या बार संदर्भात असणारे कायदेशीर हक्क समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. शिवाय कायदेशीर परवाना असल्याने यात बेकायदेशीर असं काहीच नाही, असेही समीर यांनी म्हटले होते. समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेमध्ये २००६ सालापासून रुजू झाले. तेव्हापासूनच हा परवाना समीर यांच्या नावावर आहे. तसेच बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख समीर यांच्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये देखील आहे, असेही स्पष्टीकरण त्यांनी यापूर्वीच दिलंय.