ठाणे -ठाण्यातील अंबिका नगर येथे ( Thane Ambika Nagar Company Fire ) असलेल्या सिलिका सायंटिफिक या इंडस्ट्रियल ( Silica Scientific ) कंपनीला शनिवारी रात्री 10च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळपास ९ सिलेंडरचे स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रयोगशाळेतील सामान तयार करण्याची कंपनी असल्याने या कंपनीत गॅस सिलेंडरचा वापर होत होता. दरम्यान हा भाग रहिवाशी असून येथील महत्त्वाचा रस्त्याचे काम गेली महिनाभर सुरू असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या उशिरा पोहचल्या आरोप स्थानिकांनी केला. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठेकेदारावर कारवाईची मागणीही स्थानिकांनी केली आहे.
अंबिका नगर परिसरातील घटना -ठाण्याच्या अंबिका नगर परिसरात सिलिका सायंटिफिक कंपनी आहे. ही कंपनी प्रयोगशाळेतील सामान तयार करण्याची आहे. या कंपनीत शनिवारी रात्री 10च्या सुमारास आग लागली आणि एकच खळबळ उडाली. या कंपनीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर असल्यामुळे स्फोट होत असल्याची तक्रार स्थानिकांनी दिल्यानंतर घटनास्थळी महावितरण कर्मचारी, वागळे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी, २- फायर वाहन, १- रेस्क्यू वाहन, २ वॉटर टँकरसह तात्काळ दाखल झाले होते. आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.