ठाणे- अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईला पाकव्याप्त म्हटल्याने शिवसेनेच्या महिला आघडीने ठाण्यात कंगनाच्या पोस्टरला काळ फासत जोडा मारो आंदोलन केले आहे. कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही यावेळेला शिवसेनेच्या महिला आघाडीने दिला आहे.
ठाण्यात आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाजवळ महिला शिवसैनिकांनी आंदोलन केले. महिला शिवसैनिकांनी यावेळेला कंगनाच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली. ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, की कंगना रणौतने मुंबईला पाकव्याप्त म्हटल्याचे वक्तव्य हे निषेधार्ह आहे. मुंबईसाठी अनेक हुतात्मे झाले आहेत. मुंबई आमची शान आहे. ती जर असेच बालीश वक्तव्य करत असेल तर तिच्या सर्व चित्रपटांवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येत असेल तर तिचे शिवसेना स्टाईलने आम्ही स्वागत करू, असा इशारा शिवसेना नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी दिला आहे.