महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपला धक्का..! उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानींच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर विराजमान

टीम ओमी कलानींच्या पाठिंब्यावर भाजपने अडीच वर्ष सत्ता भोगली. मात्र, टीम ओमी कलानींच्या पंचम कलानी यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने टीम ओमी कलानीने महापौर निवडणुकीत भाजपचा वचपा काढला आहे. शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना ४३ मते मिळून त्या महापौरपदी निवडून आल्या. तर भाजप आणि मित्रपक्ष उमेदवार जीवन ईदनानी यांना ३५ मते मिळाली.

लिलाबाई अशान

By

Published : Nov 22, 2019, 5:10 PM IST

ठाणे- राज्यातील नव्याने तयार झालेल्या राजकीय समीकरणामुळे उल्हासनगर महापालिकामध्ये भाजपला फटका बसला आहे. महाविकास आघाडीने सत्ता काबीज करीत लिलाबाई अशान महापौरपदी विराजमान झाल्या.

विशेष म्हणजे टीम ओमी कलानीच्या पाठिंब्यावर भाजपने अडीच वर्ष सत्ता भोगली. मात्र, टीम ओमी कलानीच्या पंचम कलानी यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने टीम ओमी कलानीने महापौर निवडणुकीत भाजपचा वचपा काढला आहे. शिवसेनेच्या लिलाबाई अशान यांना ४३ मते मिळून त्या महापौरपदी निवडून आल्या. तर भाजप आणि मित्रपक्ष उमेदवार जीवन ईदनानी यांना ३५ मते मिळाली. यामुळे भाजपचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपला मोठा झटका लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या लिलाबाई अशान

उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचे रिपाईचे भगवान भालेराव यांना ४४ मते मिळाली तर भाजपचे विजय पाटील यांना ३४ मते मिळाली. खळबळजनक बाब म्हणजे भाजप पक्षाचा व्हीप झुगारून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या टीम ओमी कलानींच्या ८ नगरसवेकांनी शिवसेनेच्या पारड्यात मते टाकली. महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक, निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या देखरेखीत पार पडली. यावेळी भाजपच्या गोटातील खासदार कपिल पाटील, आमदार गणेश नाईक, किसन काथोरे, या निवडणुकीपासून दूर होते. तर केवळ माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या वतीने एकट्यानेच किल्ला लढविला.

याउलट महाविकास आघाडीचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, शांताराम मोरे, कल्याण जिल्ह्याप्रमुख गोपाळ लांडगे, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपेंसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, राष्टवादी व रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, उल्हासनगर महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून सत्ता स्थापनेसाठी ४० नगरसेवकांची मॅजिक फिगर लागते. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक ३२ नगरसवेक, शिवसेना २५, राष्ट्रवादी ४, रिपाई ३, कॉग्रेस, भारिप, पीआरपी प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, टीम ओमी कलानीने भाजपचा वचपा काढण्याचे ठरवल्याने त्यांच्या गटातील नगरसेवकांमुळे सत्ता स्थापन झाली. यामुळे पंचम कलानी यांना स्थायी समितीचे सभापती पद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details