ठाणे- वाढत्या उन्हाचा फटका मानवालाच नाहीतर पक्ष्यांनाही बसत आहे. वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढू लागल्या की, पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. यावर्षी मात्र मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आल्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
वाढत्या उन्हामुळे पक्षी जीवनावर विपरीत परिणाम; शिवनलिनी प्रतिष्ठानतर्फे कृत्रिम पाणवठे - पाणवठे
पक्ष्यांना ग्लुकोज व प्रतिजैविकांच्या औषधांची गरज असून उडण्यास सक्षम झाल्यास रात्री नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे असल्याचे मत पक्षीमित्रांनी व्यक्त केले.
![वाढत्या उन्हामुळे पक्षी जीवनावर विपरीत परिणाम; शिवनलिनी प्रतिष्ठानतर्फे कृत्रिम पाणवठे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3070363-thumbnail-3x2-thanee.jpg)
यावर्षी मार्चपासूनच ऊन वाढल्याने कबूतर, कोकिळा, घुबड, पोपट, सी-गल्स, घार या पक्ष्यांना त्रास होवू लागला आहे. त्यामुळे, दरवर्षीपेक्षा जास्त पक्ष्यांचे जीवनमान यंदा खालावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पक्ष्यांना ग्लुकोज व प्रतिजैविकांच्या औषधांची गरज असून उडण्यास सक्षम झाल्यास रात्री नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे असल्याचे मत पक्षीमित्रांनी व्यक्त केले.
शिवनलिनीतर्फे कृत्रिम पाणवठे - शिवनलिनी प्रतिष्ठानतर्फे कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी पक्षांना पाणी पिण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली. शहरातील गणेशनगर, संगितावाडी, नांदीवली अशा विविध भागात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे महाव्यवस्थापक अनिरूद्ध कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अँड. गणेश मिश्रा, जनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश काळे, अँड. विद्या शुक्ला, अमोल काकडे, विनोद गिरी यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
पक्ष्यांसाठी काय कराल? - घर अथवा इमारतीवर पाण्याची भांडी ठेवा. पाण्यात ग्लुकोज टाकल्याने पक्ष्यांना आधार मिळू शकेल. पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत. या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका. शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.