ठाणे - रविवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या रूपात राजकीय भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र बिंदू ठाणे जिल्हा आहे. या राजकीय घडामोडीनंतर भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार शांताराम मोरे नॉटरिचेबल ( Shiv Sena MLA Shantaram More Not Reachable ) आहेत. यामुळे त्यांच्या घरी जाऊन संपर्क साधला असता, त्यांच्या पत्नी आशा मोरे यांनी सांगितले की, माझे पती पंधरा तारखेच्या अयोध्या दौऱ्यावरून ते घरी आले. त्यानंतर विधान परिषद निवडणूक झाल्यापासून त्यांचा आमच्याशी संर्पक झालाच नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
आमदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने भिवडीत खळबळ - विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मतांची फाटाफूट झाली. गद्दारांना क्षमा नसणार असे बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचीच मते फुटल्याचा संध्याकाळनंतर समोर यायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मंत्रिमंडळातील मातब्बर मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबतीला तेराहून अधिक शिवसेना आमदार नॉटरिचेबल झाले. त्यानंतर गुजरातमधील सुरतमध्ये असल्याचे समोर आले. एकूणच घडामोडी महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार डळमळीत होत असताना एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला असलेल्या आमदारांमध्ये भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे हे सुद्धा असल्याचे समोर आले. भिवंडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
आमदार मोरे यांचा राजकीय प्रवास - आमदार मोरे हे भिवंडी ग्रामीण (अनुसूचित जमाती) साठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघातून २००९, २०१४ आणि २०१९ असे तिन्ही वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत. ते ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचे एकेकाळी चालक म्हणून कार्यरत होते. मात्र शिवसेनाला अनुसूचित जमातीचा मातबर उमेदवार न मिळाल्याने आमदार मोरे यांना २००९ साली अचानक आमदारकीचे तिकीट देऊन थेट विधानसभेत पाठवले. तेव्हापासून आमदार मोरे हे भिवंडी ग्रामीण भागाचे आमदार म्हणून सलग तीन वेळा निवडणून आले.