ठाणे -एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. ठाणे जिल्ह्याची जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी नव्याने केदार दिघे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे असून, आता ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध दिघे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
ठाणेकरांना लवकरात लवकर याची माहिती द्या - दिघे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर केदार दिघे प्रतेक शाखेत जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मालेगावच्या सभेत आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत सर्व काही माहीत असल्याचे वक्तव्य केले होते. जर तुम्हाला आधीपासून माहीत होते तर इतके वर्ष का गप्प राहिलात असा प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु, आता उशिरा का असेना पण ठाणेकरांना लवकरात लवकर याची माहिती द्या असे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सांगितले. तर, ठाण्यात आनंद दिघे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक आहेत. त्यामुळे ठाण्यातील शिवसैनिक आमच्यासोबत असल्याचा दावा केदार दिघे यांनी केला आहे.