ठाणे :नागरिकांसह व्यापाऱ्यांकडून जीएसटी आणि इन्कम टॅक्ससह विविध कर वसूल केले जातात. मग हा पैसा जातो कुठे, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित केली आहे. लसीकरणावरून केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधत नागरीकांच्या कर रूपाने मिळालेल्या पैशातून तरी लस विकत घेऊन ती नागरीकांना मोफत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
'वीज बिलावरून सरकारचे घुमजाव' -
रेल्वे प्रवास अथवा मॉलमध्ये जाणाऱ्या नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यावर मुभा दिली. मात्र, नागरीक लस घेण्यास तयार असताना त्यांना दोन डोस उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. टी.बी., कॅन्सर आणि एड्ससारखे आजार असणारेही रुग्ण आहेत. कोरोनाकाळात संपूर्ण जग बंद करून कसे चालेल, असा प्रश्न शर्मिला ठाकरे यांनी उपास्थित केला आहे. शिवाय कॅनडा, अमेरीकेतील लॉकडाऊन काळात तेथील नागरीकांच्या खात्यात पैसे जमा केले गेले. आपल्या इथेही नागरीकांच्या खात्यात पैसे टाका, अशी मागणीही त्यांनी यांनी केली आहे. कोरोना काळात सर्व सामान्य माणूस सर्व बाजूंनी गांजला असता, त्याला वीजेची भरमसाठ बिले पाठविण्यात आली आहेत. वीज बील कमी करण्याचा दिलेल्या शब्दावर सरकारने घूमजाव केले, असे सांगत शर्मिला ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.