महाराष्ट्र

maharashtra

ठाण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांना मिळाला रोजगार; अगरबत्ती पॅकिंग करून करताहेत उदरनिर्वाह

By

Published : Jun 26, 2020, 6:55 AM IST

Updated : Jun 26, 2020, 7:54 PM IST

ठाण्यात लॉकडाऊनच्या काळात देहविक्री करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. या महिलांना श्री साई सेवा संस्थेकडून अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळवून देण्यात आले आहे.

ठाणे
ठाणे

ठाणे - भिवंडी शहरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. या हनुमान टेकडी परिसरात गिऱ्हाईकाच्या शोधात भिरभिरणाऱ्या नजरांनी खुणावणारे हात आता अगरबत्ती पॅकिंग करण्यात गुंतले आहेत.

महिलांसाठी सामाजिक आरोग्य विषयक काम करणाऱ्या श्री साई सेवा संस्थेच्या प्रमुख स्वाती खान यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या वारांगणांना देहविक्री न करण्याची शपथ घालून दिली. यावेळी महिलांच्या हाताला काम नसल्याने अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून येथील ५६५ महिलांना वेळोवेळी अन्नधान्य, इतर जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. परंतु लॉकडाऊन कालावधी वाढत गेला, तशी येथील महिलांची तगमग वाढली. दोन वेळचे जेवण मिळते पण इतर खर्चासाठी, घरभाडे यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे या महिलांनी 'आम्हाला काम पाहिजे' असा तगादा लावला. संचालिका स्वाती खान यांनी तहसीलदार व उद्योगपती यांच्या माध्यमातून महिला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्या प्रयत्नातून आता या महिलांना महिला अगरबत्ती पॅकिंगचे काम मिळाले, अशी माहिती स्वाती खान यांनी दिली.

काम करण्यास उत्सुक असलेल्या निवडक २५ महिलांची निवड करून त्यांना पंधरा दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांचे काम समाधानकारक राहिल्यास अगरबत्ती पॅकिंगचे काम निरंतर सुरू राहणार असून या प्रशिक्षण कालावधीत महिलांना २१० रुपये प्रतिदिन मानधन स्वरूपात दिले जाणार आहेत. सायंकाळी महिलांना हळद दूध व उकडलेले अंडे असा पौष्टिक आहार देत त्यांना प्राणायामाचे धडे दिले जात आहेत. लॉकडाऊनमध्ये आम्हाला या संस्थेच्या माध्यमातून मुबलक अन्नधान्य मिळाले. तसेच अगरबत्ती पॅकिंगच्या या कामाने आमची पैशांची अडचण दूर झाली, असे या महिलांनी सांगितले. हे काम असेच सुरू राहिल्यास आपण देहविक्री व्यवसायातून बाहेर पडू, असा विश्वास एका महिलेने व्यक्त केला. या महिलांसोबत त्यांच्या मुलांनादेखील स्वयं रोजगार करता यावा, यासाठी लायटिंगचे तोरण, दिवे बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्व कामातून जगण्याची नवी ऊर्जा मिळत असल्याचे महिलांनी बोलून दाखविले.

Last Updated : Jun 26, 2020, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details