ठाणे - पाहुणी म्हणून मावशीच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली होती. त्यातच पून्हा पाहुणी म्हणून त्याच मावशीच्या घरी जाण्यास पीडित मुलगी भयभीत झाल्याने ७ वर्षानंतर तिच्यावरील झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेवर मावशीच्या नवऱ्यानेच लैंगिक अत्याचार केल्याने एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अत्याचारी काका विरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
धमकी देऊन करायचा लैंगिक अत्याचार -
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सात वर्षांपूर्वी, म्हणजेच २०१४ साली तिच्या आई वडिलांसोबत कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिच्या मावशीच्या घरी काही दिवसांकरिता पाहुणी म्हणून राहण्यास गेली होती. तेव्हा आरोपीने पीडित मुलीवर वारंवार लैगिंक अत्याचार करून या घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास लहान बहिणीसोबत देखील लैंगिक अत्याचार करण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली. यामुळे पीडित मुलगी सात वर्षापासून प्रचंड मानसिक दबावाखाली वावरत होती. या प्रकरणामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने या घटनेची माहिती आतापर्यंत कुणालाही दिली नव्हती.