ठाणे- कोरोना रुग्णांसाठी महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नगरसेवकांच्या निधीला कात्री लावली जाणार असल्याने भाजपने याला विरोध केला आहे. भाजपला आता महापौर नरेश म्हस्के यांनी थेट उत्तर दिले असून महाराष्ट्रात प्रत्येक गोष्टीचे जे राजकारण केले जात आहे तसे राजकारण आपण कृपया ठाण्यात करु नये, अशी विनंती केली आहे.
भाजपने ज्या बैठकीवर आक्षेप घेण्यात आला त्या बैठकीत यावर चर्चाच झाली नसल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. तसेच निधी देण्याबाबत सर्व नगरसेवकांनी अनुमती दिली आहे. त्यामुळे उगाच राजकारण करुन चांगल्या कामात खोडा न घालण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. कोरोना रुग्णालयासाठी नगरसेवक निधी वापरण्याऐवजी आपला दवाखाना निधी वापरावा, असे मत भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. त्यावर महापौर नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये निधी वर्ग करण्याचा परस्पर निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. परंतु, या बैठकीमध्ये नगरसेवक निधीबाबत कोणत्याही प्रकारे चर्चा अथवा निर्णय झाला नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. त्यातही ही बैठक पालकमंत्र्यांनी शिष्टाचाराप्रमाणे बोलविलेली बैठक नव्हती, त्यामुळे या बैठकीस स्थानिक आमदार, कोकण पदवीधर आमदार, गटनेते यांना बोलवणे अपेक्षीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या कोरोनाची युध्दजन्य परिस्थीती असल्यामुळे ठाणेकरांच्या हितासाठी घेतलेल्या बैठकीचे राजकीय अर्थ लावून त्याचे राजकारण करु नये, असेही मस्के यांनी स्पष्ट केले.