ठाणे - आर्थिक वादातून मित्रानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने मित्राचा काटा काढल्याची ( Murder By Friend In Financial Dispute ) घटना नाशिक महामार्गावर गोलभण गावाजवळ घडली. या घटनेतील मुख्य आरोपी संदीप सरवणकर (४७) हा मुंबईत राहणारा आहे. तर त्याचे साथीदार प्रवीण शिंदे (२१) सागर मराठे (२४) हे मूळचे जळगावचे असून मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ( ४ जुलै रोजी) पोलिसांच्या गस्ती पथकाला शहापूर तालुक्यातील गोलभण गावा जवळ असलेल्या मुंबई – नाशिक महामार्गावरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेली स्कॉर्पिओ कार दिसली. संशयावरून कारची तपासणी केली असता पोलीस पथकाला सुमारे एका व्यक्तीचा मृतदेह ( Body Found In Scorpio Car ) डोक्याला बंदुकीची गोळी व दगडाचा मार लागलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता. MH-06 AN, 1436 नंबर च्या स्कॉर्पिओ कारमध्ये मृतदेह टाकून अज्ञात आरोपींनी मुंबई – नाशिक महामार्गच्या बाजूला एका झाडा खाली उभी करून कार सोडून पसार झाले होते.
चेकबुकमुळे पटली मृतदेहाची ओळख -दोन दिवसापासून स्कॉर्पिओ कार मुंबई नाशिक महामार्गा लगत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांकडून कारची तपासली असता स्कार्पिओ कारमध्ये मृतक प्रफुल पवार याचे नावाने चेक बुक आढळून आले होते. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. मृतक पवार हे बांद्रा परिसरात राहणारे असल्याचे समोर आले. त्यानंतर मृतकच्या पत्नीचा पोलिसांना शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, मृतक प्रफुल्ल हे १ जुलै रोजी घरातून स्कॉर्पिओ कारने एका कार्यक्रमासाठी निघाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा संर्पक झाला नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मृतकच्या मोबाईल कॉल डेटा रेकॉर्डमुळे आरोपी जाळ्यात -पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारावर तपास करून मृतक पवार यांच्या मोबाईल कॉल डेटा रेकॉर्डच्या आधारे मुख्य आरोपी सरवणकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्याने सुरवातीला पोलिसांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कसून चौकशीत त्यानेच मित्रांच्या साथीने पवार यांची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली आहे.