महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 10, 2022, 7:32 PM IST

ETV Bharat / city

वास्तववादी व काटकसरीचा ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीला केला सादर

कोरोना काळातही उत्पन्न वाढीसाठी साहाय्यभूत ठरणारा ठाणे महानगरपालिकेचा सन 2021 - 22 चा सुधारित 3 हजार 510 कोटी रुपयांचा तर, सन 2022-23 सालचा 3 हजार 299 कोटी रुपयांचा मुळ अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला.

Dr Vipin Sharma on Thane mnc budget
ठाणे महापालिका अर्थसंकल्प

ठाणे -कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, भांडवली खर्चात स्वीकरलेल्या पायाभूत कामे पूर्ण करण्यावर भर देणारा, वास्तववादी अर्थसंकल्प तसेच, कोरोना काळातही उत्पन्न वाढीसाठी साहाय्यभूत ठरणारा ठाणे महानगरपालिकेचा सन 2021 - 22 चा सुधारित 3 हजार 510 कोटी रुपयांचा तर, सन 2022-23 सालचा 3 हजार 299 कोटी रुपयांचा मुळ अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना सादर केला.

माहिती देताना पालिका आयुक्त आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक

हेही वाचा -Murder of Brothers Wife : संपत्तीच्या वादातून दिराने केला भावजयीचा खून, आत्महत्येचा बनाव पडला उघडा

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. गतवर्षातील पहिल्या अर्थसंकल्पात कोरोना सारख्या जागतिक महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन व संचारबंदी तसेच, नागरिकांवर अनेक बंधने आणावी लागली. त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्न स्रोतांवर झालेला होता. अशा परिस्थितीत विविध उत्पन्न स्रोतांपासून अपेक्षित उत्पन्नाचे व त्याप्रमाणात खर्चाचे अधिकाधिक वास्तविकतेच्या जवळ जाणारा अंदाज गृहीत धरून चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.

सन 2021 - 22 या आर्थिक वर्षातही या जागतिक महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती कायम राहिल्याने दुसरी व तिसरी लाट नियंत्रित आणण्यासाठी शासनाद्वारे लागू करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांतर्गत लॉकडाऊन, संचारबंदी इत्यादीचा परिणाम महापालिकेच्या प्रत्यक्ष उत्पन्नावर झालेला आहे. नागरिकांचे जीव वाचविणे व त्याचवेळी कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रित ठेवून शहर संरक्षित ठेवणे हा प्रमुख केंद्रबिंदू ठेवून कोरोनाबाधितांना आवश्यक औषधे, ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सोयीसुविधा पुरविणे, जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांचे लसीकरण व त्याचवेळी शहरातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण व्यवस्था, स्वच्छता व जनजागृती इ. मार्गाचा अवलंब करावा लागल्याने महापालिका निधीतून मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागलेला आहे. अशा संकटकालीन परिस्थितीतही ठाणे महापालिकेचे पदाधिकारी, सदस्य आणि प्रशासन यांच्या सांघिक प्रयत्नातून खर्चात काटकसर, हाती घ्यावयाच्या कामाची आवश्यकता विचारात घेऊन कामाचा प्राध्यान्यक्रम निश्चित करून कामे हाती घेणे, इत्यादी बाबतीतील सुयोग्य नियोजनामुळेच शहराची यशस्वी वाटचाल सुरू आहे. कोरोना काळात सर्वांनाच संकटांचा प्रचंड सामना करावा लागला. महापालिकेकडून देखील या संकटातून वाट काढत ठाणेकर नागरिकांना जास्तीत जास्त मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

मागील दोन वर्षांत कोरोना या महाभयंकर विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जागतिक स्तरावर महामारी घोषित करण्यात आली. त्याचा परिणाम सर्व उद्योगधंदे, व्यवसाय व रोजगारावर झाल्यामुळे महापालिकेसही अपेक्षित असलेले कर, दर व शुल्कापोटी काही बाबींचा अपवाद वगळता उर्वरित बाबींपासून अपेक्षित महसूल प्राप्त झाला नाही. परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. हा अर्थसंकल्प तयार करताना उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करून प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचार विनिमय करूनच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.

अनपेक्षित बजेट वाढले

सन 2021-22 चे मूळ अंदाजपत्रक 2 हजार 755 कोटी 32 लक्ष रकमेचे तयार करण्यात आले होते. यामध्ये काही विभागांकडून अपेक्षित केलेले उत्पन्न साध्य होत नसले तरी शहर विकास विभागाकडून अपेक्षित उत्पन्नापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तसेच, शासनाकडून क्लस्टर योजना, पंधरावा वित्त आयोग, पायाभूत सुविधा अंतर्गत अनुदान तसेच, माझी वसुंधरा अंतर्गत बक्षीस रक्कम इत्यादीचा विचार करता सुधारित अंदाजपत्रक 3 हजार 510 कोटी रकमेचे तयार केले आहे. व सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 299 कोटी रकमेचे मूळ अंदाजपत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे.

बजेट सेशनमध्ये नगरसेवकांचा गोंधळ

ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होत असताना काँग्रेसचे नगरसेवक विक्रम चव्हाण यांनी प्रशासनाचा निषेध करत हा अर्थसंकल्प रद्द करण्याची मागणी केली. स्थायी समिती सदस्यांना अर्थसंकल्पाची कॉपी न देता ती थेट वृत्तपत्रांना कशी मिळाली, असा परखड सवाल विक्रम चव्हाण यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना केला. अर्थसंकल्प हा अत्यंत गोपनीय दस्तावेज असून तो सादर होण्यापूर्वीच वृत्तपत्रांमध्ये कसा छापला गेला, याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अर्थसंकल्पाची प्रत नगरसेवकांना देण्याची प्रथा असताना ती थेट वृत्तपत्राला देण्यात आल्याने संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली.

हेही वाचा -Video : व्हॅलेंटाईन फिवर....जेव्हा एकनाथ शिंदे गाणं गातात!

ABOUT THE AUTHOR

...view details