ठाणे -बहीण भावा मधील अतूट नात्याला एका रेशमाच्या धाग्याने बळकटी मिळू शकते हे दर्शवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून आपले रक्षण करण्याचे वचन मागते आणि भाऊ सुद्धा तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो, या रक्षाबंधन सणानिमित्त दरवर्षी विविध प्रकारच्या रंगी-बेरंगी आणि अनोख्या राख्यांनी बाजारपेठीतील दुकान अगदी फुलून जातात, आणि या राख्यांमध्ये दरवर्षी नव्याने राख्यांचा एक ट्रेंड पाहायला मिळतो. तसाच ट्रेंड यंदा ठाण्यात देखील पाहायला मिळतोय, तो म्हणजे ठाण्यातील नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावांच्या राख्यांचा.
अनोख्या राख्या - बहीण आणि भाऊ यांच्या अतूट प्रेमाचे बंधन असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणानिमित्त बाजारपेठा विविध प्रकारच्या रंगी बेरंगी, चमकदार आणि अनोख्या राख्यांनी सज्ज झालेल्या पाहायला मिळत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळे ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत असतांना ठाण्यात यंदा सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राख्यांनी. याअगोदर आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या राख्या पाहिल्या आहेत. मात्र, आता ठाण्यात प्रथमच ठाणेकर असलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्याने त्यांच्या फोटोच्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
राज्यातील बहिणीचे संरक्षण करतील - आपला मुख्यमंत्री, मी एकनाथ शिंदे समर्थक,आपले मुख्यमंत्री असा मजकूर असलेल्या राख्या विक्रीसाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि या राख्यांना ठाणेकरांनी पसंती देखील दिलेली पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यां व्यक्तीपर्यंत सर्वच या राखीला पसंती देत आहेत. भाऊ हा बहिणीचे संरक्षण करतो. त्याचप्रमाणे आमचे ठाण्याचे भाऊ आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आमचे संरक्षण करतील, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने ठाण्याच्या बहिणींचेच नाही तर राज्यातील बहिणीचे संरक्षण करतील या उद्देशाने या राख्या बनवल्या असल्याच्या भावना राखी विक्रेता कल्पना गांगर यांनी व्यक्त केल्या आहेत.