ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मंगळवार (दि. 12 एप्रिल)रोजी ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची मनसे सैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. सुमारे ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता मनसेकडून वर्तविली जात आहे. (Raj Thackeray Sabha In Thane) तसेच, मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दीक वादानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात 'उत्तरसभा' अशा आशयाचे फलक उभारले आहे. त्यामुळे राज ठाकरे सभेत काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सभेची तयारी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सुरू - गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मशींदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू झाल्या. त्यानंतर राज ठाकरे यांची अचानक ९ एप्रिलला ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली. परंतु, चैत्र नवरात्रौत्सव आणि गडकरी रंगायतन येथील एका कार्यक्रमामुळे पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती. अखेर १२ एप्रिल आज डॉ. मूस मार्गावर ही सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सभेची तयारी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झालेली आहे.