ठाणे -ठाणे महापालिकेचे लसीकरण मोहीम तेजीत सुरू असताना कळव्यातील आटकोनेश्वर नगर भागात एका चाळीस वर्षीय व्यक्तीला कोरोना ऐवजी रेबीजची लस देण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पालिकेच्याच आरोग्य केंद्रावर रेबीजची लस दिल्याचा प्रकार घडल्याने ठाणे महापलिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
हेही वाचा -डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण 'असे' घडले; आत्तापर्यंत ३३ आरोपींना अटक
रेबीज लस दिलेल्या त्या व्यक्तीची प्रकृती सद्या स्थिर असून, आरोग्य केंद्रवरील उपस्थित असलेल्या डॉक्टर राखी तावडे आणि परिचारिका कीर्ती रायात यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.
बदनामी नको म्हणून कारवाई
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या कळवा, आतकोनेश्वर नगर भागात महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. या केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्रावर एका व्यक्तीला कोरोना लसीऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याची बाब पुढे आल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टरासह परिचारिकेला निलंबित करण्यात आले आहे.
आज दुसरे निलंबन
फेरीवाल्यांकडून हफ्ता घेतल्या प्रकरणात आज एका शिपायाचे निलंबन झाले. या नंतर कळवा भागातील लसीकरण बाबतीत हलगर्जीपणा दिसल्याने दोघांचे निलंबन झाले. म्हणजे, आज एकूण तिघांचे निलंबन झाले आहे.
हेही वाचा -ठाणे : महिला पोलीस कर्मचारी ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासात सुरक्षा अधिकारी पदावर