ठाणे -पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती वाहतुकीचा वाढलेला खर्च आणि एकूणच झालेले महागाई या सर्व दुष्ट चक्रामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात असताना आता त्यात जीवनावश्यक असलेल्या दुधामुळे आणखी भर पडली आहे. अचानक वाढलेल्या किंमतीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
दुधाच्या किंमती दोन रुपयापासून चार रुपयांपर्यंत वाढले आहेत ( Milk Prices Hike ) आणि या वाढलेल्या किंमतीमुळे महिन्याचे बजेट हाताळणाऱ्या गृहिणी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकूणच पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे महागाईत भर पडली असताना आता दुधाचे दरही वाढले आहेत. सरकारने यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
दुधाला पर्याय नाही, विक्रीवर होतो परिणाम -दूध ही अत्यावश्यक बाब असून त्याला दुसरा पर्याय नाही. दूधाच्या किंमती वाढल्याने त्यांचा परिणाम दुग्धजन्य पदार्थांवरही होतो. त्यामुळे नागरिकांना निमूटपणे ही दरवाढ सहन करावी लागते. पण, यामुळे दुधाच्या विक्रीवर परिणाम होतो. जे ग्राहक दोन लिटर दूध घेत होते ते आता दीड लिटर घेत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यामुळे एकूणच व्यवसायावर परिणाम होत असल्याचे विक्रेते सांगत आहे.