ठाणे- येथील ठाणे रेल्वे स्थानकात एकूण आठ सरकते जिने (एस्कलेटर) आहेत. हे जिने दररोज २०० ते ३०० वेळा बंद पडत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच जुलै महिन्यात अंदाजे १० वेळा हे सरकते जिने बंद पडल्याचे देखील समोर आले आहे. याबाबत स्टेशन मास्तरांशी विचारले असता त्यांनी हे योग्य आकडे नसल्याचे सांगितले आहे. परंतु, दिवसातून १५ ते २० वेळा हे जिने विविध कारणास्तव बंद पडतात, असे सांगितले आहे.
मोठा गाजावाजा करून आणि प्रवाशांच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बसवलेले सरकते जिने सातत्याने बंद पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ठाणे हे ऐतिहासिक शहर असून येथून दररोज प्रवास करणाऱ्या जवळपास सात ते आठ लाख प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तब्बल आठ सरकते जिने या रेल्वे स्थानकात लावण्यात आले आहेत. याचा विशेष लाभ हा ज्येष्ठ नागरिक, हृदयरोगी, दम्याचे रोगी, गरोदर महिला यांना होतो. या सरकत्या जिन्यांमुळे सामान्य प्रवाशांनाही खूप फायदा होतो. परंतु गेल्या काही महिन्यांत हे सरकते जिने सातत्याने बंद पडत असल्याने लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सरासरी जवळपास ३०० वेळा हे एस्कलेटर्स बंद पडत असल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. नागरिकांना जिने चढताना प्रचंड त्रास होत असून हे बंद पडलेले जिने म्हणजे सामान्य प्रवाशांच्या पैशांची खुलेआम लूट असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. बंद पडलेले जिने दुरुस्त करण्यासाठी ठेवलेले कर्मचारी हे कधीच वेळेवर येत नाहीत व मुळात हे जिने असे सारखे बंद का पडतात हा प्रश्न कायम आहे. तसेच याबाबत ठाणे रेल्वेस्थानक मास्तरांनी ही आकडेवारी योग्य नसून दिवसातून १५ ते २० वेळा हे सरकते जिने बंद पडत असल्याचे सांगितले आहे.