ठाणे -अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी NCBच्या अटकेत असलेल्या आर्यन खानसोबत कोर्टात सेल्फी काढणाऱ्या पंच किरण गोसावीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील पंच मनिष भानुशाली हा एका पक्षाचा पदाधिकारी आहे, हा गौप्यस्फोट केला होता. तर आता याच प्रकरणातील पंच किरण गोसावी याच्यावर मुंबई आणि ठाण्यात काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. या किरण गोसावीशी कुटुंबीयांनी गेल्या १०-१२ वर्षांपासून संबंध तोडले आहेत. त्याचा आणि आमचा काहीही एक संबंध नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया किरण गोसावीच्या कुटुंबीयांनी दिली आहे. किरणचे कुटुंबीय ज्या इमारतीत राहतात त्या ठिकाणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी..
हेही वाचा -होय... गोसावी-भानुशालीच्या माहितीच्या आधावरच क्रूझवर केली कारवाई, एनसीबीचा खुलासा
दाखल आहेत दोन गुन्हे
किरण गोसावी याने ठाण्यातील लेक सिटी मॉलमधील जी 13 आणि आज कार्यालयातून शिवा इंटरनॅशनल नावाने कार्यालय सुरू केले. अनेक बेरोजगार युवकांना विदेशात नोकरी देतो, म्हणून लाखो रुपये घेतले आणि नोकरी न देता त्यांची फसवणूक केली. ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात याबाबत दोन गुन्हे दाखल आहेत.
जॉबसाठी लाखो रुपये घेऊन केली फसवणूक
नोकरीचे आमिष दाखवून किरण गोसावीने पैसे घेतल्यासंबंधी सनोज जैस्वारने साऊथ आफ्रिकेतून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने किरणला कठोर शासन व्हावे, अशी मागणीही केली आहे.
शेजाऱ्यांची प्रतिक्रिया
किरण 12 वर्षांपासून त्याच्या कुटुंबासोबत राहत नाही. त्याच्या कुटुंबीयांना किरणमुळे खूप त्रास भोगावा लागला. त्याच्या कुटुंबाने त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत, अशी माहिती इमारतीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.
'माझ्यासह कुटुंबाला त्रास'
किरणने वडील प्रकाश गोसावी यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण त्याची माहिती उद्विग्न होऊन दिली. तो बाहेरच असतो, त्याचा आमचा काही संबंध नाही. २०१२पर्यंत तो आमच्यासोबत राहायचा पण आता नाही. या प्रकरणानंतर पण आमचा काही संबंध नाही. वर्षभर त्याचे थोबाड पण मी बघितले नाही. त्याच्याशी मला काही घेणे-देणे नाही. त्याला अटक करा, त्याला गोळ्या घाला. मला खूप वाईट वाटत आहे, अशी औलाद मी जन्माला घातली. त्याच्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये आहे. गेल्या 12 वर्षांपासून मी हा त्रास सहन करत आहे. त्याला कायद्याने फाशी दिली, तरी मला वाईट वाटणार नाही. मी ३५ वर्ष पोलीस खात्यात नोकरी केली, पण सुपारीचा पण नाद नाही, मी प्रामाणिकपणे नोकरी केली आहे, त्यामुळे मला बॅड फिलिंग होत आहे. किरणमुळे माझ्यासह संपूर्ण परिवाराला त्रास झाला, अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे.
हेही वाचा - Cruise Drug Case : एका परदेशी नागरिकाला एनसीबीने केली अटक, ड्रग्स पुरवठा केल्याचा आरोप
किरणची माहिती
शिक्षणात रस नसल्याने आणि इतर व्यसनामुळे किरण बी. कॉम. पण झालेला नाही. सुरुवातीला कॉल सेंटरमध्ये काम करणारा किरण खासगी बँकेत कामाला होता. लग्नानंतर त्याला एक मुलगा आहे, पण काही दिवसातच त्याचा घटस्फोट झाला. त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे.