ठाणे - ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालेले तीन आरोपी प्रदीप शर्मा, सुनील देसाई आणि विकास दाभाडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सेशन न्यायालयात अर्ज केला होता. दरम्यान, विकास दाभाडे याने अर्ज मागे घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनीही कुठलेही कारण न देता जामीन अर्ज मागे घेतला. तर याच प्रकरणातील सुनील देसाई यांचे वकील गैरहजर राहिल्याने त्यांच्या अर्जावर १९ ऑगस्ट रोजी सुनावणी करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
दुसरीकडे आरोपी विमल अगरवाल हे CCTV मध्ये नाचत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आरोपी मोकाट असून, यामुळे तक्रारदार केतन तना याचे कुटुंबीय भीतीच्या वातावरणात असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.
हेही वाचा -५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी छोटा राजनच्या पुतणीला अटक
- काय आहे प्रकरण?
ठाण्याच्या ठाणेनगर पोलीस ठाण्यात ३० जुलै रोजी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि चकमक फेम प्रदीप शर्मा यांच्या टीमसह तब्बल २८ जणांवर खंडणी, धमकावणेसह विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता. या २८ जणांपैकी तिघांनी ठाणे सेशन न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तर सुनावणीपूर्वीच विकास दाभाडे यांनी आपला अर्ज मागे घेतला. तर सोमवारी ९ ऑगस्ट रोजी चकमक फेम प्रदीप शर्मा यांनी कुठलेही कारण न देता जामीन अर्ज मागे घेतला. तर न्यायालयात आज सुनील देसाई यांच्या जामीन अर्जावर असलेली नियोजित सुनावणी सोमवारी होणार होती. मात्र, देसाई यांचे वकील गैरहजर राहिल्याने सुनावणी न्यायालयाने पुढे १९ ऑगस्ट रोजी ढकलली. तसेच तक्रारदाराचे कुटुंब दहशतीच्या सावटाखाली असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.