ठाणे - देशात कोरोनाचा प्रादुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. असे असताना भिवंडी शहरात रस्त्यांवर विनाकारण दुचाकी चालवत फिरणाऱ्या हुल्लडबाज तरुणांवर पोलिसांनी सोमवारी रात्रीपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
संचारबंदीत रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या तरुणांच्या गाड्या जप्त हेही वाचा...कोरोना लॉकडाऊन ! संचारबंदीचा आदेश धुडकावणारे काय करताहेत पाहा...
भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका, शिवाजी चौक, धामणकर नाका, कशेळी टोल नाका आदी ठिकाणी हुल्लडबाजी करत बाईकने मोकाट फिरणाऱ्या तारुणांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. तर, काही ठिकाणी उठाबशा काढायला लावल्या. तसेच लॉकडाऊनच्या काळापर्यंत दुचाकी जप्त करण्याची कारवाई देखील भिवंडी पोलिसांकडून करण्यात आली.
विशेष म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनाने संचारबंदी लागू करून नागरिकांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, तरीही काही हुल्लडबाज तरुण रस्त्यावर फिरत आहेत. यामुळे भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी भिवंडी परिमंडळ दोनच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना या हुल्लडबाज तरुणांवर कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून ही कारवाई सुरू झाली. सोमवारी या कारवाईत हुल्लडबाजांनी पोलिसांचा चांगलाच धसका घेतला असल्याने मंगळवारी दुपारपर्यंत रस्त्यावर कोणीही फिरताना आढळले नाही.