ठाणे -एका वादग्रस्त ऑर्केस्टा बारवर विठ्ठलवाडी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना ऑर्केस्टामधील नर्तिका तोकडे कपडे परिधान करून डीजेच्या तालावर अश्लील व बिभत्स नृत्य करत असताना आढळले. पोलिसांनी या कारवाईत १० नर्तिकांसह २ वेटर आणि मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. या बारमध्ये ग्राहक सुध्दा मध्य सेवन करून नर्तिकांसोबत अश्लील हवभाव करत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी १० नर्तिकांसह वेटर व मॅनेजर अशा १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर २ वेटर व मॅनेजरला अटक केली आहे. प्रमोदकुमार गुप्ता असे ऑर्केस्ट्रा बार मॅनेजरचे नाव आहे. सत्यम दास (२३), जीवनकुमार रजत (१९) असे मॅनेजरसह अटक केलेल्या वेटरचे नाव आहे.
उल्हासनगर शहरातील श्रीराम चौकात अॅपल लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार आहे. या बारमधील नर्तिका अंगावर तोकडे कपडे परिधान करून अश्लील हावभाव करत मद्यपी ग्राहकांना इशारा करून हिंदी गाण्यांवर अश्लील नृत्य करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना मिळाली. त्या माहितीवरून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस.निरीक्षक (गुन्हे) एन. जी खडकीकर, पोलीस उपनिरीक्षक आर.आर.पाटील, एस.बी.राजपूत यांच्यासह डीबी पथकातील हवालदार पालवे व पोलिस पथकाने अॅपल लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारवर अचानक छापा टाकला. त्यावेळी बारमध्ये ऑर्केस्ट्रा स्टेजवरील चार सिंगर महिला 'खुदा गवाह' या हिंदी चित्रपटातील "मै तूझे कबूल तू मुझे कबूल" हे गाणे गात होत्या. या गाण्यावर स्टेज समोरील मोकळया जागेत अंगात तोकडे कपडे परिधान केलेल्या १० नर्तिका अश्लील नृत्य व हावभाव करत ग्राहकांना आकर्षित करताना पोलिसांना दिसून आले.
याप्रकरणी महिला पोलीस नाईक ज्योत्स्ना मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात अॅपल लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारचे मॅनेजर प्रमोदकुमार गुप्ता, वेटर सत्यम दास व जीवनकुमार रजत, १० नर्तीका अशा १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी १० नर्तीका महिलांना जामीनावर सोडण्यात आले असून मॅनेजर व २ वेटर यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पालवे करत आहेत.