ठाणे - खारी-पाव विक्रीच्या व्यवसायाच्या स्पर्धेतून दुकानदाराने शेजारी राहणाऱ्या लाँड्री चालकाची हत्या केली आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील वालधुनी परिसरात असलेल्या अशोक नगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे लाँड्रीच्या व्यवसाय परिणाम झाल्याने लाँड्रीचालकाने खारी-पावचा व्यवसाय सुरू केला होता.
सल्ल्लुद्दीन यामिन अन्सारी ( वय, २५) कशिमउद्द्दीन यामिन अन्सारी ( वय, २८) मोहंमद नाजीम अन्सारी (वय, २०) हत्याप्रकरणी अटक केलेल्या त्रिकुटाचे नावे आहेत. तर रोशनलाल कनोजिया (वय ४५) असे हत्या झालेल्या लॉन्ड्री चालकाचे नाव आहे.
कोरोनाच्या धसक्याने देशभरासह राज्यात गेल्या चार महिन्यापासून केंद्र व राज्य सरकारने टाळेबंदी घोषित केली होती. सध्या लॉन्ड्री व्यवसाय बंद असल्याने पाव, खारी व बिस्कीटचा व्यवसाय रोशनलाल व त्यांचा भाऊ अमरबहादूर यांनी स्वत:च्या घरासमोर सुरू केला. त्यांच्या दुकानाच्या शेजारी आरोपी सल्ल्लाउद्दीन याचाही पाव, खारी, स्टोट विक्रीचा व्यवसाय होता. रोशनलाल हे पाव विक्री करीत असल्याने आरोपीच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते.
जून महिन्यातही अमरबहादूर यांचा त्याच्या शेजारी राहणाऱ्या आणि पाव विक्री करणाऱ्या सलाउद्दीन अन्सारी, काशिमउद्दिन अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी यांच्यात पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता. गिऱ्हाईक अमर यांच्याकडे जात असल्याने सलाउद्दीन अन्सारी यांना राग होता.
त्यातच आज सकाळीदेखील अमरबहादूर कनोजिया आणि आरोपी सलाउद्दीन यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी सलाउद्दीन अन्सारी, काशिमउद्दिन अन्सारी यांनी अमरबहादूर यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांच्या छातीवर व पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी अमरबहादूर यांचे भाऊ रोशनलाल कनोजिया हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना देखील छातीवर, पोटावर व शरीरावर लाथाबुक्क्यांनी जोराने मारहाण केली. यामुळे रोशनलाल खाली पडले असता, त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचे घोषित केले. रोशनलाल हे व्यवसायाने रिक्षाचालक होते. अटकेतील आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवर यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पत्रे करीत आहेत.