ठाणे- वाढीव विज बिलांनंतर राज्यात विविध पक्षांकडून आंदोलन करण्यात आली. मात्र त्यानंतरही सर्वसामान्य जनतेला वीजबिलातून सवलत मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी वीजबिलाच्या मुद्यावरून मनसेच्या वतीने २६ नोव्हेंबरला ठाण्यात सरकारच्या विरोधात मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मोठ्याप्रमाणात मनसैनिक सहभागी होणार होते. मात्र, पोलिसांनी ठाणे जिल्हा बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच मोर्चाला परवानगीही नाकारली आहे. त्यामुळे मनसेच्या आंदोलनाला आता ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
मनसेच्या वीजबील कपात आंदोलनाला पोलिसांची खीळ; जिल्हाबंदीनंतरही मनसे ठाम - ठाण्यात जिल्हा बंदी
वाढीव वीजबिले कमी करण्याच्या मागणीसाठी मनसेनेने सरकारच्या विरोधात ठाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, आता पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तसेच ठाण्यात जिल्हाबंदी लागू केली आहे. यावर मनसेकडून मोर्चा काढण्याचा निर्णय ठाम असल्याचे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी स्पष्ट केले.
मनसेच्या नियोजित भव्य मोर्च्याबाबत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलीस उपयुक्तांनी बोलावून घेतले होते. गुरुवारी ठाणे जिल्हाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी जाधव यांना दिली. तसेच मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यातही आली. यावर जाधव यांनी संताप व्यक्त केला. तसेच आंदोलन केल्यास मनसैनिकांना नोटीस बजावण्यात येणार आहेत, हे सगळे अन्यायकारक आहे. यापूर्वी भाजपने अनेक मोर्चे काढले, त्याविरोधात कारवाई झाली नाही. मात्र, आता मनसे रस्त्यावर उतरत असतानाच अशा प्रकारचा अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, कितीही दडपशाही झाली तरी मनसेचा मोर्चा हा निघणारच, असा दृढ विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.