मीरा भाईंदर (ठाणे) - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरोपातून मुक्त करून देण्याच्या मोबदल्यात खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यासहित सात जणांविरुध्द मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यातील एक आरोपी हा शिवसेना आमदार गीता जैन यांचा सख्खा भाऊ आहे.
मीरा भाईंदर शहरातील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार त्याच्यावर असलेल्या आरोपातून मुक्त करण्याकरिता माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी १५ कोटीची मागणी केली होती. त्यानुसार मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये एकूण आठ जणांची नावे आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात संजय पुनमिया आणि सुनील जैन दोघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा-SANGLI RAIN कृष्णा नदीचे पाणी शिरले नागरी वस्तीत; 15 कुटुंबाचे तातडीने स्थलांतर
प्रकरण युएलसी घोटाळ्यासंदर्भात असल्याचा संशय
विशेष बाब म्हणजे संजय पुनमिया हा शिवसेना आमदार गीता जैन यांचा सख्खा भाऊ आहे. तर तक्रारदार अग्रवाल हे युएलसी घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यामुळे हे प्रकरण युएलसी घोटाळ्यासंदर्भात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-पंचगंगेने मध्यरात्री ओलांडली धोक्याची पातळी; कोल्हापुरात महापुराचे संकट येण्याची भीती
काय आहे युएलसी घोटाळा प्रकरण?
मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील अनेक जमिनी या यूएलसी कायद्याच्या अंतर्गत येतात. त्याच्याबाबत बोगस दाखले ठाण्यातील यूएलसी विभागाने देऊन शासनाचा महसूल बुडवला होता. यात अनेक बिल्डरांनी स्वतः चा फायदा करून घेतला. या प्रकरणी 2012 साली ठाणे पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली होती. असे दाखले देणाऱ्या या विभागाच्या अप्पर जिल्हाधिकारी भास्कर वानखेडे यांचा कालांतराने मृत्यू झाला. मात्र, याच विभागाचे सहाय्यक नगर रचनाकार असणाऱ्या दिलीप घेवारे आणि सत्यवान धनेगावे हे या प्रकरणात वाचले होते. त्यांचा सहभाग असतानाही राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत होती. या प्रकरणात सुरवातीला आधी 4 बिल्डरांसह 5 जणांना अटकही झाली होती.
हेही वाचा-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर पोहोचले माणगावात... बचाव कार्याचा घेतला आढावा
परमबीर सिंग यांच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचा हप्ता वसुली करायला लावल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. त्यांच्याच विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अकोल्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकानेही परमबीर सिंह यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
परमबीर यांचे अनिल देशमुख यांच्यावर आरोप-
अँटिलिया येथील स्फोटक प्रकरणात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली होती. यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप लावले होते. याप्रकरणी सीबीआयने चौकशी दरम्यान अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले. सध्या त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.