ठाणे- कपड्याच्या कारखान्यात तलवार-चॉपर-कोयता घेऊन दरोडा टाकण्याचा 5 जणांचा प्लॅन उल्हासनगर पोलिसांनी उधळून लावला. या सराईत दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 2 स्मशानभूमी जवळ असलेल्या लक्ष्मीनारायण कंपाऊंडमधील कपड्याच्या कारखान्यात घडली आहे. रोहीत झा, विजय उर्फ नन्हे राय, आकाश काते, उमेश जाधव, अभिनंदन तिवारी अशी दरोडेखोरांची नावे असून यापैकी रोहित झा व नन्हे राय हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प नंबर 2 स्मशानभूमी जवळ असलेल्या लक्ष्मीनारायण कंपाऊंडमधील कपड्याचा कारखाना आहे. या कारखान्यात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोर रोहीत झा व त्याचे साथीदार सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस नाईक मिलिंद बोरसे यांना खबऱ्याकडून मिळली होती. त्यावरुन त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र चौधरी, उपनिरीक्षक योगेश माळी असे पथक तैनात करण्यात आली.