नवी मुंबई -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने सुडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राज्यभरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. आक्रमक झालेले नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या प्रेमापोटी ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयाकडे जाण्यासाठी मुंबईत रवाना होत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. ईडी कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये म्हणून ठिकठिकाणाहून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. कोणतीही गडबड होऊ नये या उद्देशाने पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले आहे.
नवी मुंबईत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची धरपकड; रेल्वेने मुंबई गाठण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न
नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. हे कार्यकर्तें मुंबईच्या दिशेने निघाले होते.
राष्ट्रवादीचे झेंडे असलेल्या गाड्या रस्त्यावर अडवून कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असल्याने काही कार्यकर्त्यांनी तर चक्क रेल्वेने प्रवास करून मुंबई गाठण्याचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे शरद पवार यांच्यासाठी कार्यकर्त्यांच्या समर्थनात सरकारने किती आडकाठी केली तरी आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिली.
राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे नोटीस बजावण्याआधीच ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. मात्र,पवारांवरील कारवाईनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहेत. आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत जमण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.