ठाणे - दिल्लीमध्ये राहणाऱ्या आतेबहिणाच्या घरी जाण्यासाठी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी उत्तरप्रदेशातील महागाव रेल्वेस्थानकावर आली. स्थानकावरील रेल्वे चौकीदाराने तिच्या अभागीपणाचा फायदा घेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर या नराधमाच्या तावडीतून सुटलेल्या पीडितेवर त्या चौकीदाराच्या दोघा मित्रांनीही तिला आधार देण्याच्या बहाण्याने दोन दिवस खोलीत डांबून आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर यातील एका नराधमाने पीडितेला गोदान एक्सप्रेसने एका मित्राकडे भिवंडीत आणून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी शिकणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या सावत्र आईच्या जाचाला कंटाळली होती. त्यामुळे तिने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन गाठले. त्यावेळी पीडितेने रेल्वे चौकीदार बबलू याच्याकडे दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेची विचारणा करण्यासाठी गेली. त्याने तिला चौकीच्या आतमधेच बोलावून बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणीने या नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. शिवाय नराधम इकरार आणि संतोष यादव या दोघांनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने भंडारी रेल्वे स्टेशन लगतच्या एका भाड्याच्या खोलीत कोंडले. त्यानंतर त्यांनीही दोन दिवस तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तिसऱ्या दिवशी नराधम संतोष यादव याने जोनपुर रेल्वे स्थानकावरुन पीडित मुलीला बळजबरीने गोदान एक्सप्रेसमध्ये बसून कल्याण रेल्वे स्थानकावर उतरवले.