ठाणे - एकीकडे कोरोनाचे संकट गंभीर होत असताना ठाणे जिल्ह्यातून रुग्ण पालिकेच्या कळवा रुग्णालयात येत आहेत. अशावेळी पालिकेच्या रुग्णालयात आवश्यक असलेले फोनदेखील बंद झाले आहेत. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि स्टाफ अनेक अडचणींना सामोरे जात आहेत.
कोरोनाच्या संकटात ठाणे पालिकेच्या रुग्णालयातील फोन बंद; आरोग्य कर्मचाऱ्यांसह रुग्णांना अडचणी - छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय
पालिकेच्या रुग्णालयातील अनागोंदी कारभाराचा नमुना समोर आला आहे. ठाणे पालिकेच्या कळवा येथील रुग्णालयातील फोन बंद आहेत.
रुग्णालयातील फोन बंद असल्याबाबत पालिका प्रशासनाने एमटीएनएलला पत्र दिले आहे. मात्र, त्यांच्याकडून आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील 3 महिन्यांपासून टेलिफोन बंद आहेत. अशा वेळी एमटीएनएलकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसत आहे.
विलगीकरण कक्ष, सोनोग्राफी कक्ष, अपघात कक्ष व मुख्य शस्त्रक्रिया कक्ष अशा महत्त्वाच्या विभागात दूरध्वनी यंत्रणा ठप्प आहे. रुग्णालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तक्की चेऊलकर यांनी एमटीएनएलची सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, आंदोलन करू, असा इशारा चेउलकर यांनी एमटीएनएलला दिला आहे. या बिघाडाचे खापर पालिका प्रशासन एमटीएनएलवर फोडत आहे. ही बाब एमटीएनएलला निदर्शनास आणून द्यायला, पालिका प्रशासनालादेखील अनेक महिने लागले आहेत. याबाबत विचारणा केल्यावर आम्ही याबाबत पाठपुरावा करत असल्याचे प्रशासनाकडून उत्तर मिळाले आहे.