ठाणे -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असताना रुग्णांना वेळेवर माहिती किंवा सुविधा मिळाव्यात, यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने अद्ययावत असा वॉर रूम उभारण्यात आला आहे. मात्र या वॉर रूममधून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी ठाणेकरांकडून प्राप्त होत असताना ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील याचा साक्षात अनुभव आला आहे. बुधवारी आयुक्त आणि पालिका अधिकारी यांनी हाजुरी येथील वॉर रूमला भेट दिली. यावेळी दिलेल्या फोन नंबर पैकी आयुक्त शर्मा यांनी फोन केला असता त्यांच्या कॉलला देखील उत्तर मिळाले नसल्याचा प्रकार घडला आहे. एक ऑपरेटर दोन फोन वापरत असल्याचे यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आले. दरम्यान, यावेळी त्यांनी सर्व डेटा ऑपरेटर यांच्याशी आयुक्तानी संवाद साधला.
आयुक्तांनी दिली वॉर रूमला भेट
ठाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोविड-19 चा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त करत असून कोविड-19 संदर्भात उपलब्ध ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड तसेच इतर मुलभूत माहिती आणि सूचना ठाणेकरांना देण्यासाठी वॉर रूमची उभारणी केली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वॉर रूममधील फोन हे नेहमीच व्यस्त किंवा प्रतीक्षेत असल्याने ठाणेकर नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. तसेच वॉर रूममधून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आल्याने स्वतः आयुक्तांनी वॉर रूमला भेट दिली. त्यांनतर आयुक्तांना देखील अशाच प्रकरचा अनुभव आला. आयुक्त शर्मा यांच्या समोर हा प्रकार घडल्याने मनुष्यबळ कमी असल्याने निदर्शनास आले.
वॉर रूममध्ये एक कॉल सुरू असेल तर दुसरा कॉल उचलता येत नाही, अशी तक्रार कर्मचारी करत असताना मनुष्यबळ वाढवले पाहिजे, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले. 23 लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरातील वॉर रूममध्ये फक्त 10 कर्मचारी काम करत आहेत. नागरिकांचा एखादा फोन आला की कमीतकमी 5 ते 10 मिनिटे माहिती देण्यासाठी लागत असून रुग्णांच्या पाठपुराव्यासाठी देखील वेळ लागतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत वॉर रूममध्ये देखील मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे.