महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धोकादायक इमारती; कल्याण-डोंबिवलीतील 10 हजार कुटुंबीयांचा जीव टांगणीला - प्रशासन

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. या यादीनुसार तब्बल 378 इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यापैकी 357 धोकादायक, तर 279 अतिधोकादायक इमारती आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने मे अखेरपर्यंत धोकादायक इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे.

महापालिका

By

Published : May 7, 2019, 12:58 PM IST

ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. या यादीनुसार तब्बल 378 इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यापैकी 357 धोकादायक, तर 279 अतिधोकादायक इमारती आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने मे अखेरपर्यंत धोकादायक इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे 10 हजारांहून अधिक कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संसाराचा गाडा घेऊन आसरा घ्यायचा कुठे, या विचाराने रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

महापालिका


पावसाळ्याची चाहूल लागताच पालिका क्षेत्रातील मरणासन्न उभ्या असलेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. 2015 साली ठाकुर्लीतील धोकादायक मातृछाया इमारत कोसळून 9 जणांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर प्रशासन पावसाळ्याआधी दोन महिने जागे होऊन खबरदारीच्या उपाययोजनेच्या मागे लागते. मात्र ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवण्यातच अधिकारी धन्यता मानतात. पावसाळ्याव्यतिरिक्त आठ महिने प्रशासन काहीही हालचाल करत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने धोकादायक इमारती तातडीने रिकामी करण्याचे आदेश दिले असले, तरी रहिवाशांनी पुनर्वसन झाल्याखेरीज इमारती रिकामी करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.


कल्याण-डोंबिवली महापालिकेत 27 गावांचा समावेश होण्यापूर्वी गेल्या वर्षी या परिसरात 357 धोकादायक, तर 279 अतिधोकादायक इमारतीची नोंद करण्यात आली होती. यातील 34 अतिधोकादायक इमारतींवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित इमारतींमध्ये आजही रहिवासी वास्तव्य करत आहेत. त्यातच यंदा आणखी किती इमारती मोडकळीस आल्या आहेत, याची नोंद पालिकेकडे अद्यापही करण्यात आलेली नाही.


यंदा पावसाळ्यापूर्वी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींवर पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते. यामुळे 15 मेपर्यंत पालिकेतील धोकादायक इमारतींची यादी पालिका प्रशासनाकडे प्राप्त होण्याची अपेक्षा होती. मात्र अद्यापही प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून या धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्याचे कारण संबधित विभागाकडून देण्यात येत आहे. त्यातच पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांमधील इमारतींची मोजदादच नसल्यामुळे या भागात गेल्या वर्षी किती आणि कोणत्या ठिकाणी धोकादायक इमारती होत्या, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही.


ठाकुर्ली दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यासह या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन या इमारती राहण्यायोग्य आहेत किंवा नाही, याचा अहवाल तयार करण्याचे प्रशासनाने बजावले होते. धोकादायक इमारतींची यादी तयार करण्याचे आदेश प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वीच दिले आहेत. मात्र अनधिकृत बांधकाम विभागाकडे अद्याप धोकादायक इमारतींची यादी प्राप्त झालेली नसून मागील वर्षीचीच यादी या विभागाकडून दिली जात आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत यादी अपेक्षित असल्याचे संबंधित विभागाच्या उपायुक्तांनी सांगितले आहे. तरी प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून मात्र इमारतीचे सर्वेक्षण करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


कल्याण-डोंबिवली महापालिकेने गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 168 अतिधोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. ही संख्या ठाणे महापालिका हद्दीपेक्षाही अधिक आहे. याशिवाय धोकादायक इमारतींचा आकडा 210 असून इतर शहरांच्या तुलनेत हा फारच कमी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी तातडीने इमारती रिकाम्या कराव्यात आणि मालक तसेच भोगवटाधारकांनी स्वखर्चाने त्या पाडून टाकाव्यात, असे आदेश महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. या इमारत मालकांची यादी महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार कल्याण-डोंबिवलीत 357 धोकादायक, तर 279 अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारती रिकाम्या करण्यासाठी महापालिका मोहीम हाती घेत असते. मात्र इमारत पाडण्यासाठी रहिवाशांनाच आवाहन करण्यात येत असल्याने महापालिकेची मोहीम नेमकी काय, याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. अतिधोकादायक इमारतीत एखादी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी असेल, अशी भूमिका महापालिका प्रशासन इमारत मालकांना बजावलेल्या नोटिसांमध्ये घेत असते.


मालक-रहिवासी वादात पुनर्विकास रखडला :


भाडेकरू आणि इमारत मालकांमध्ये समेट घडवणे खरे तर पालिका आयुक्तांना सहज शक्य आहे. पुनर्विकासात रहिवाशांचे हक्क अबाधित ठेवले तरच ना हरकत परवाना दिला जाईल, असा फतवा जरी काढला तरी बरेच प्रश्न निकाली निघू शकतात. मात्र प्रशासन इमारत मालकांची तळी उचलण्यात धन्यता मानतात, असा उघड आरोप भाडेकरूंचा आहे. 25 वर्षांहून अधिक काळ रहिवासी या इमारतींमध्ये राहतात. पगडी पद्धतीने एकदाच ठोक रक्कम देऊन त्यांनी घरे घेतली आहेत. शिवाय महिन्याला भाडेही देतात. त्यामुळे हक्काच्या घराची त्यांची मागणी रास्त आहे.


मालक-भाडेकरू वाद नित्याचाच :


चार वर्षांपूर्वी ठाकुर्ली येथील अतिधोकादायक इमारत कोसळून नऊ रहिवाशांना जीव गमवावा लागला होता. यानंतर या पडलेल्या इमारतीमधील कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात रात्र निवारा केंद्रात आसरा देण्यात आला. कल्याण-डोंबिवली शहरातील अनेक धोकादायक इमारतींमध्ये मालक आणि भाडेकरू हा वाद असून भाडेकरू इमारती सोडण्यास तयार नाहीत. यामुळे या इमारतींची यादी तयार करून या रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी घरे रिकामी करण्याच्या सूचना देणे आवश्यक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details