ठाणे - उत्तर प्रदेशातील लखीमपुरखीरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने गाडीने चिरडून ८ जणांचा बळी गेला. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला होता. बंद दरम्यान किरकोळ घटना वगळता जिल्ह्यातील शहरीभागासह ग्रामीणमध्ये दुपारपर्यत कडकडीत बंदचा असर दिसून आला.
सकाळपासूनच कार्यकर्ते रस्त्यावर -
आज महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर सकाळपासूनच शिवसेना, कॉग्रेस , राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी कल्याण, डोंबिवली , भिवंडी , उल्हानसागर , अंबरनाथ , बदलापूर शहरी भागात एकत्र येत रस्त्यावर उतरून भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करीत दुकाने बंद केली. विशेष म्हणजे काही व्यापारी संघटनांनीही बंदमध्ये सामील होत असल्याचे जाहीर करीत सांयकाळी ४ वाजेपर्यत दुकाने बंद ठेवली होती.
रस्ता रोको करताना पोलिसांची हुज्जतबाजी -
डोंबिवलीत कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात अंदोलन केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर कल्याणमधील राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संदीप देसाई यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको करतेवेळी पोलिसांना सोबत हुज्जत झाली. यावेळी मला अटक केली तर मी अंगावर राँकेल ओतून आत्मदहन करण्याचा देसाई यांनी पोलिसांना इशारा दिला. त्यामुळे पोलिसांनी शांत राहण्याची भूमिका बजावली होती. तर भिवंडी शहरातील यंत्रमाग नगरीची धडधड दुपारपर्यत थांबली होती. शिवाय उल्हासनगर शहरातही बंदचा प्रतिसाद दिसून आला. तर सकाळच्या सुमारास विविध शहरात रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचे पाहून शिवसैनिकांनी त्या बंद केल्या होत्या. मात्र, दुपारनंतर सर्व शहरातील रिक्षा वाहतूक सुरु झाली होती. एकंदरीतच दुपारपर्यत कडकडीत बंदचा असर दिसून आला.
नरेंद्र मोंदींच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध -
शहापूर व मुरबाड तालुक्यात निषेध रॅली काढण्यात आल्या. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. तर शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी निषेध रॅली काढत केंद्रातील भाजप सरकार हे किसान विरोधी सरकार असून या सरकारचा निषेध करण्यासाठी व मृत्त पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज महाआघाडी सरकारच्यावतीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्रित पण येऊन महाराष्ट्र बंदची हक दिल्याचे सांगितले. एकंदरीतच ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मुख्य बाजारपेठा कडकडीत बंद करण्यात आला होत्या.
हेही वाच - राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राचा हिरवा कंदील; २०२२ मध्ये सुरू करणार वाहतूक