ठाणे - मृतदेह आदलाबदलीचे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासनाने चौकशी सुरु केली होती. त्या चौकशीमध्ये कोणतीही वैद्यकीय चूक झाली नसून त्यात प्रशासनिक चुका झाल्याचे समोर आले आहे. चुकीच्या नोंदी या प्रकरणात घेतल्या गेल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. योगेश शर्मा यांना पदावरून हटवले आहे. तसेच कामावर असलेल्या चार परिचारिकांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिली आहे. तसेच या रुग्णालयासाठी पूर्ण वेळ नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या गलथान कारभारामुळे सोनावणे आणि गायकवाड यां कुटुंबीयांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सनदी अधिकार रणजित कुमार, यांच्यासह तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे अहवाल सुपूर्द केले असून गुरुवारी पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणावर खुलासा केला. सदर प्रकाराबद्दल आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली असुन ग्लोबल हॉस्पिटलमध्ये झालेला प्रकार हा कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थनीय नसल्याचे सांगितले.