मीरा भाईंदर(ठाणे) -मीरा भाईंदर शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थिती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी ६० ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयात रुग्णांची लूट होत असल्याने त्यांनी महापालिका प्रशासनावर टीका केली आहे.
एका ऑक्सिजन मशीनची किंमत ४५ हजार रुपये आहे. ऑक्सिजन मशीनचा शहरातील रुग्णांना फायदा निश्चित होईल, अशी अपेक्षा आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. आज ६० ऑक्सिजन मशीन दिल्या आहेत. अधिक मशीन लागल्यास उपलब्ध करून देऊ, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाबाधितांची संख्या वाढता मीरा भाईंदर शहरात एकमेव सरकारी रुग्णालय आहे. त्यामुळे उपचार करण्यासाठी ऑक्सिजन मशीनची कमतरता भासत आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळल्यामुळे अनेक रुग दगावल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. आमदार सरनाईक यांनी उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सिजन मशीन कोरोनाबाधित तसेच इतर रुगणांसाठीही उपलब्ध आहेत.
खासगी रुग्णालयांमध्ये लूट-
ऑक्सिजन मशीनची गरज भासल्यास शिवसेनेच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार सरनाईक यांनी केले आहे. त्याठिकाणी शाखाप्रमुख तसेच त्याचे दूरध्वनी नंबर दिले आहेत. खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची लूट सुरू आहे. याबाबत मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे लेखी पत्राद्वारे सविस्तर माहिती मागवली आहे. खासगी रुग्णालयात किती कोरोना रुगांवर उपचार झाले? राज्य सरकारच्या नियमांचे पालन खासगी रुग्णालयात होत नाही. खासगी रुग्णालयातील अनेक तक्रारी येत असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली. पुढे ते म्हणाले, की ठाण्यातील एका रुग्णालयाची नोंदणी रद्द झाली. मग मीरा भाईंदरला खासगी रुग्णालयावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आमदार सरनाईक यांचा प्रशासनाला इशारा
खाजगी रुग्णालय आणि प्रशासनाची संगनमत सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला. आयुक्तांनी ३ ऑगस्टपर्यंत ठोस पावले खासगी रुग्णालयावर उचलावीत. अन्यथा, मला प्रत्येक रुग्णालयामध्ये जावे लागेल, असा इशाराही आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिला आहे.