ठाणे - कल्याण-डोंबिवलीतील चारही विधानसभेच्या उमेदारीवरून युतीत सध्या धुमशान सुरू आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या मतदारसंघात, शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी शिवसेनेचे मजबूत संघटन बांधल्याने कल्याण लोकसभा हा भाजपाचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेने प्रतिष्ठेचा करत स्व:तकडे घेतला.
तेव्हापासून भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत शिवसेनेनं तबल २२ वर्ष कल्याण डोंबिवली महापालिका, अगदी स्थापनेपासून ताब्यात ठेवली. मात्र सध्या 'शिवसेनेचा बालेकिल्ला जरी असला, तरी येथील चारही विधानसभेत भाजपचा बोलबाला ' असल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदाच्याही निवडणुकीत कल्याणच्या उमेदारीवरून युतीत धुमशान पाहयला मिळणार आहे.
हेही वाचा... पवारांच्या 'हट्टा'पोटी काँग्रेसची वाताहात?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण - डोंबिवलीत भाजपाने शिवसेनेला अस्मान दाखवले. तेव्हापासून शिवसेनेत मोठी नाराजी आहे. गेल्या वेळी ४ पैकी ३ विधानसभा मतदारसंघांत विजय मिळवून भाजप व सहयोगी अपक्ष आमदार निवडणून आणून मोठी मुसंडी मारली. आता तर लगतच्या नवी मुंबईतील गणेश नाईक यांनी भाजपचे कमळ हातात घेतल्याने भाजपचे बळ अजूनच वाढले आहे. त्यामुळे डोंबिवलीचे आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोबिवलीत झंझावात निर्माण करण्याचे मनसुबे भाजपाकडून रचले जात आहेत.
2014 विधानसभा निवडणुकीत भाजप सेनेची युती नसताना 'कल्याण पश्चिम'मधून भाजपचे नरेंद्र पवार, 'कल्याण पूर्व'तून भाजपचे सहयोगी अपक्ष गणपत गायकवाड, 'डोंबिवली'मधून भाजपाचे रविंद्र चव्हाण आणि 'कल्याण ग्रामीण'मधून शिवसेनेचे सुभाष भोईर विद्यमान आमदार आहेत.
कल्याण पश्चिममध्ये तिरंगी सामना
कल्याण पश्चिम मधून २००९ मध्ये मनसेचे प्रकाश भोईर आमदार म्हणून निवडून आले. त्यांनतर २०१४ मध्ये भाजप-सेनेची युती तुटल्याने भाजपकडून नरेंद्र पवार, सेनेकडून बंड्या उर्फ विजय साळवी तर पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न पाहून मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनीही निवडणूक लढवली. मात्र भाजपच्या नरेंद्र पवार यांनी मनसे-सेनेला धोबी पछाड देत बाजी मारली. यंदाच्या निवडणुकीत कल्याण पश्चिमेत भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्यासह नगरसेवक संदीप गायकर, नगरसेवक वरुण पाटील, साधना रवी गायकर, वैशाली पाटील, महेश जोशी, अर्जुन म्हात्रे, साईनाथ तरे, नगरसेवक अर्जुन भोईर, डॉ. चंद्रशेखर तांबडे असे तब्बल १० जण इच्छुक आहेत. हा मतदार संघ शिवसेनेला देण्यात यावा अशी सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळीच शिवसेनेने कल्याण पश्चिमेवर दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी साईनाथ तरे यांनी मुलाखतीला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला जातो की भाजपला? तसेच इच्छूकांची संख्याही अधिक असल्याने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली जाते की पक्षनेतृत्व काही वेगळा विचार करते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा... पक्षांतराचे पर्व... युतीत आले आघाडीचे 'साखर सम्राट' सर्व!
कल्याण पूर्व भाजपमय, मात्र सेनेचे कडवे आव्हान
कल्याण पूर्वेतून अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. २००९ च्या पहिल्या टर्ममध्ये ते आघाडीसोबत होते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. भाजपचे सहयोगी आमदार म्हणूनच ओळखले जातात. गायकवाड यांना शिवसेनेत खेचण्यासाठी सेनेच्या नेतृत्चाकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र कल्याण पूर्व हा जागा वाटपात शिवसेनेला कि भाजपला जातो याबाबत संभ्रम आहे. मात्र गायकवाड हे भाजपच्या मुलाखतीत हजर राहून त्यांनी इच्छूकता दर्शवल्याने कल्याण पूर्वेतून गायकवाड हे भाजपचे उमेदवार असणार हे स्पष्ट झाले. आमदार गायकवाड यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कल्याण पूर्वतून यावेळी आमदार गायकवाड, विष्णू गायकवाड, हर्षल साळवी असे तीन जण इच्छूक आहेत. त्यामुळे हा मतदार संघ भाजपच्या वाटयाला जाणार हे जवळपास निश्चितच समजले जात आहे. तर गेल्या निवडणुकीत अवघ्या ७४५ मतांनी शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांना पराभव पत्करावा लागला होता. कल्याण पूर्वेतून लांडगे हे सुध्दा इच्छुक आहेत. मात्र युती होणार की नाही, याचीच आतुरता सगळ्यांना लागलेलीआहे. युती झाल्यास शिवसेना काय निर्णय घेते, हेसुध्दा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.