नवी मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पनवेल आणि नवी मुंबईचा दौरा केला. सदर भागात भेट देऊन फडणवीस यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासन आणि महापालिका प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी, महाविकासआघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्यांनी आपापसातील समन्वय वाढावावा, असे फडणवीस यांनी म्हटले.
नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहेत. त्यातच आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिका प्रशासनाकडून काय उपचार आणि उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीवरही त्यांनी ताशेरे ओढत आयुक्तांची बदली करणे चांगले नाही, सरकार आपले अपयश आयुक्तांच्या माथी मारत असल्याची शंका उपस्थित होत आहे, असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा; महापालिका सज्ज
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नगरविकास मंत्री आहेत. त्यांना देखील बदल्यांबद्दल माहिती नव्हती. राज्यातील महाविकासआघाडीमध्ये समन्वय नाही. मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. लॉकडाऊनसारखे निर्णय शासनाने विचारपूर्वक घ्यावेत, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.