ठाणे - योद्धा गमावला तरी, पोलीस खात्याशी असलेली कुटुंबाची नाळ तुटता कामा नये. यासाठीच कोरोना काळात मृत्यु पावलेल्या पोलीसांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर पोलीस सेवेची संधी उपलब्ध करून दिली, असे कृतज्ञतेचे भाव राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी व्यक्त केले. ठाणे पोलीस आयुक्तालयातील दिवंगत पोलिसांच्या कुटुंबातील एका सदस्याला १० दिवसात प्रक्रिया राबवून पोलीस खात्यातील विविध पदावर नियुक्तीचे पत्र नगराळे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पोलिसांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून कर्तव्य पार पाडले-
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भारतातही लॉकडाऊन करण्यात आले होते. मुंबई, ठाण्यात तर कोरोनाने कहर केला त्यामुळे या कसोटीच्या काळात पोलिसांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून कर्तव्य पार पाडले. ठाणे पोलीस हद्दीत कोरोनामुळे ३४ असे एकूण ७५ पोलीस कर्मचारी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबातील वारसदाराला पोलिसांकडून पोलीस खात्यात नोकरी मिळाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याहस्ते शुक्रवारी साकेत मैदानात हा कार्यक्रम पार पडला.
ठाणे पोलिसांचे कौतुक करावे, तितके कमीच-
यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस सहआयुक्त सुरेश मेकला यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ठाणे, मुंबईत कोरोनाच्या काळात पोलिसांवर जास्त भार होता. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी पोलिसांनी मनापासून काम केले. तेव्हा, शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या कुटुंबाची १० दिवसात कागदपत्रांची पूर्तता व मेडिकल चाचणी करून ठाणे पोलिसांनी महत्वाचे पाऊल उचलले. त्यामुळे ठाणे पोलिसांचे कौतुक करावे, तितके कमीच आहे, असे मत नगराळे यांनी यावेळी व्यक्त केले.
ठाणे पॅटर्न राज्यभर राबविणार - नगराळे
राज्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्य झाला आहे.भावनात्मक विचार करून पोलीस खात्याने सकारात्मक विचार केला असून कुटूंबाना आधार मिळावा यासाठी राज्यभर ठाणे पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती हेमंत नगराळे यांनी सांगितले.दरम्यान राज्यामधील कोरोना बाधित पोलीस, उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना "कोरोना वॉरियर मेडल" देण्यात यावे असा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे ठेवणार असल्याचेही नगराळे यांनी सांगितले.
हेही वाचा-एल्गार परिषदेतील 'त्या' भाषणावरून वादंग, भाजप नेत्यांकडून कारवाईची मागणी