ठाणे - स्मार्टफोनवर सद्या ऑनलाईन जुगाराचा ( Online Gambling ) सुळसुळाट पहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांवर अनेक जण खेचले जात आहेत. यात नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश तर आहेच, विशेष म्हणजे ऑनलाईन जुगार खेळाकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ( Student attraction towards online gambling ) बहुतांश टीव्ही चॅनेलवर प्रसिद्ध अभिनेते, मॉडल हे जाहिरातीत झळकतांना दिसत आहे. यामुळे अशा जुगाराच्या आहारी गेलेल्यांमध्ये शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा अधिक आहे.
सायबर पोलिसांकडे तक्रारी दाखल .. एकीकडे सायबर पोलिसांच्या ( Cyber Police ) ही बाब लक्षात आली आहे. काही तक्रारीसुद्धा त्यांच्यापर्यंत गेल्या आहेत. पण, कायद्याने बंदी नसल्याने विविध भागांत ऑनलाईन जुगाराचे अड्डे सर्रास सुरु आहेत. यात तरूणाई दिवसेंदिवस अडकत चालली आहे. यातूनच तरुणांमध्ये नैराश्य वाढत आहे. अशा जुगारावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डोंबिवली विधानसभा क्षेत्र, कमिटीचे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील ( Bhalchandra Patil ) यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ठिकठिकाणी थाटले ऑनलाईन मटका/जुगाराचे अड्डे ... या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी पोलिसांचे लेखी तक्रारीद्वारे लक्ष वेधले आहे. या संदर्भात पाटील यांनी ऑनलाईन मटका/जुगार अड्डे चालविणाऱ्या काही माफियांची नावेही या निवेदनात नमूद केली आहेत. डोंबिवलीत ललित पटेल, प्रकाश पटेल हे दोन कुख्यात मटका किंग असून या जुगार माफीयांनी संगनमत करून लॉटरीच्या नावाखाली शहरात ऑनलाईन ऑनलाईन मटका/जुगाराचे अड्डे थाटले आहेत. शहरातील चौकाचौकांतील दुकानांतून सुरू असलेल्या या अड्ड्यांवर लोकांची दररोज लाखो रूपयांची फसवणूक करत आहे.