ठाणे - जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रापंचायत निवडणुकीत वेगळंच राजकीय वातावरण पाहवयास मिळाले. शिवसेनेसह भाजपनेही बहुतांश ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र अवघ्या एका मतामुळे कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत टीम ओमी कालानी या पक्षाने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सेनेच्या गटाचा दारुण पराभव झाला असून शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील कांबा ग्रामपंचायतीत सरपंच पदी भारती भगत आणि उपसरपंच पदी संदीप पावशे यांचा विजय झाला आहे. १३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत गांवदेवी पॅनलला ७ तर शिवसेनेच्या गटाला ६ मत पडली. त्यामुळे एक मताने पराभव झाल्याने सेनेच्या तो जिव्हारी लागला आहे. ही निवडणूक शिवसेना आणि टीम ओमी कालानी पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. अखेर एका मतासाठी सेनेला पराभव पत्करावा लागला आहे. आता याठिकाणी सरपंच आणि उपसरपंच टीम ओमी कालानी पक्षाचा बसला आहे.