नवी मुंबई -भावाचा हळदी कार्यक्रम उरकून घरी निघालेल्या बहिणीला एका भरधाव गाडीने उडवले. या अपघातात बहिणीचा जागीच मृत्यू तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पनवेलच्या खांदा कॉलनी परिसरात घडली. दरम्यान अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रोडपाली बौद्धवाडी येथील अनुराग गायकवाड यांचे २७ डिसेंबरला लग्न होते. या लग्नासाठी अनुराग यांची बहिण सोनल आणि तिचे पती राहुल अंधेरीहून आले होते. रात्री उशिरापर्यंत हळदीचा कार्यक्रम रोडपाली बौद्धवाडीत सुरू होता. तो आटोपून सोनल आणि राहुल हे दाम्पत्य त्यांच्या स्कूटी क्रमांक एम एच 46 क्यू 4334 वरून पनवेल सुकापूर येथे त्यांच्या आईच्या घरी जात होते.
काही कारणासाठी सोनल व राहुल हे रस्त्याच्या बाजूला उभे असताना, त्याच वेळी एक भरधाव वेगाने आलेल्या गाडीने दोघांना उडवले. तेव्हा परिसरातील नागरिकांनी दोघांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सोनलला मृत घोषित केले. तर राहुलवर अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.