ठाणे : त्रिपुरा राज्यातील घटनेचा निषेधार्थ विविध राजकीय पक्षांनी निषेध व्यक्त करून शुक्रवारी भिवंडीत बंद पुकारला होता. या बंदच्या वेळी पाच हिंसकांनी भिवंडीतील मंडई येथील पेपर प्रिंटिंगच्या दुकानात शिरून दुकानातील वृद्धास शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात वृद्धाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध सुरु केला असता रविवारी पोलिसांनी ५ हिंसकांना अटक केली आहे. खुर्शिद आलम मोहम्मद शमीम (२२),मसूद मकदुमअली अन्सारी (३०) व त्यांचे अन्य तीन साथीदार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दुचाकीवरून आला होता जमाव
अजित बद्रीनारायण कलंत्री (६१) यांचे भिवंडीतील मंडई भागात प्रिंटिंग प्रेस आहे. शुक्रवारी ते दुकानात असतानाच दुचाकीवरून येवून २० ते २५ जणांचा जमाव अजितच्या दुकानात शिरून "तुम्हाला माहीत नाही का? आज भारत बंद आहे. तुमचे दुकान बंद करा, सरकार हमारी सुनेगा हम सरकारका नही सुनेंगे" अशी धमकी दिली. मात्र, त्यावेळी अजित यांनी दुकान बंद करण्यास नकार दिल्याने पाच जणांनी दुकानात विटांचे तुकडे फेकून अजित यांना बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश राजे करत असून, त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
भिवंडी बंद : वृद्धाला दुकानात घुसून बेदम मारहाण; ५ हिंसकांना अटक - bhiwandi crime news
भारत बंदच्या वेळी पाच हिंसकांनी भिवंडीतील मंडई येथील पेपर प्रिंटिंगच्या दुकानात शिरून दुकानातील वृद्धास शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली.

भिवंडी बंद